Breaking News

दिवाळीत भारनियमन नाही; ऊर्जामंत्र्यांची ग्वाही

नागपूर, दि. 14, ऑक्टोबर - राज्यात झालेले भारनियमन तात्पुरते होते. नैसर्गिक संकटामुळे कोळसा टंचाई निर्माण होऊन वीज निर्मिती प्रभावित झाल्याने भारनियमन करावे लागले, मात्र आत्ता परिस्थिती पुर्णत: नियंत्रणात असून दिवाळीत भारनियमन होणार नसल्याची ग्वाही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली.
यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले की, एमसीएल आणि एसईसीएल कंपनीच्या कोळसा खाणींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोळस्याची टंचाई निर्माण झाली होती. महानिर्मितीला दररोज 28 रॅक्स कोळस्याची गरज असतांना टंचाईमुळे दररोज केवळ 14 ते 15 रॅक्स कोळसा मिळत होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी याप्रश्‍नी पुढाकर घेत कोल ईंडीयाच्या अधिका-यांसोबत बैठक घेतल्यानंतर कोळशाचा पुरवठा वाढू लागला आहे. काल 29 रॅक्सचा तर त्यापुर्वी 27 रॅक्स कोळसा मिळाला असल्याने परिस्थिती नियंत्रणात असून विजकेद्रांना आवश्यक असलेल्या 21 दिवसांचा कोळसा साठा करण्यावर भर असून येत्या दिवाळीत भारनियमन होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तिन्ही वीज कंपन्यांतील कर्मचा-यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्याबाबत कामगार संघटनासोबत झालेल्या चर्चेनंतर बावनकुळे यांनी दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व सुत्रधारी कंपन्यांतील सुमारे 77 हजार कर्मचार्यांना 13, 500 रुपयांचे तसेच कंत्राटी कामगारांना 7,500 रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे तीन्ही कंपन्यांतील कर्मचारी संघटनांचे समाधान झाले. या चर्चेदरम्यान उर्जामंत्र्यांनी कर्मचारी संघटनांच्या सुचना आणि शासनाची त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांबाबत येत्या नोव्हेंबर महिन्यात बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.