Breaking News

खा . खैरे यांच्याबरोबरचे मतभेद मिटले - आ. हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद, दि. 15, ऑक्टोबर - शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांच्या खासदार निधीतून कन्नड तालुक्यात दाखविण्यात आलेली विकास कामे झालीच नाहीत असा गंभीर आरोप करून खळबळ उडवून देणार्या कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज आपले खैरे यांच्या बरोबरचे वाद मिटले असून लोकसभा निवडणुकीत खैरे यांच्याच पाठीशी उभे राहणार असे एका कार्यक्रमात जाहीर केले. शिवसेनेच्या निवडून आलेल्या सरपंचांच्या सत्काराचा कार्यक्रम आज येथील तापडिया नाट्यगृहात झाला त्यावेळी या दिलजमाईची घोषणा दोघांनीही केली. खा. खैरे यांनीही आता जाधव यांनी फक्त शिवसेनेचाच सत्कार स्विकारावा असे सांगत पडदा पाडला. आ. संजय शिरसाट यांनी शिवसेनेत वाद असल्याचे चित्र माध्यमेच रंगवतात असे सांगत माध्यमांवर खापर फोडले. या कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.