Breaking News

लोडशेडिंग आणि महागड्या विजेचे गौडबंगाल काय -अजित पवार

पुणे, दि. 08, ऑक्टोबर - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये मी उर्जामंत्री असताना महाराष्ट्रात लोडशेडिंग का, हा प्रश्‍न देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी  विचारला होता. लोडशेडिंग आणि महागड्या विजेचे गौडबंगाल काय, असाही प्रश्‍न फडणवीस यांनी विचारला होता. आता पिंपरी-चिंचवड, पुण्यासह राज्यात लोडशेडिंग  आहे. याला जबाबदार कोण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची उत्तरे द्यावीत. आता लोडशेडिंग कोणासाठी आणि कशासाठी केली  आहे, असा खडा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे निकाल आणखी लागले नाहीत. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण ? असा प्रश्‍न करीत भाजप सरकार फेकू सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीविरोधात तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शनिवारी)  ’जन हाहाकार’ मोर्चा काढला. त्यानंतर पिंपरी चौकात झालेल्या सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल,  माजी महापौर व नगरसेविका मंगला कदम, अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, हनुमंत गावडे, महिला शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली  काळभोर, नगरसेविका अनुराधा गोफणे, उषा काळे, उषा वाघेरे, शितल काटे, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर,  युवती अध्यक्षा वर्षा जगताप तसेच राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.