Breaking News

चिपळूणला 3 नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा

रत्नागिरी, दि. 31, ऑक्टोबर - चिपळूण येथील पाग व्यायामशाळा व चिपळूण नगरपालिकेच्या वतीने सदतिसावी मल्लखांब अजिंक्यपद नगराध्यक्ष चषक राज्यस्तरीय स्पर्धा  अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात 3 ते 5 नोहेंबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेतून निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. राज्यातील सुमारे 800 खेळाडू स्पर्धेत सहभागी होणार  आहेत. यापूर्वी 1990 व 2003 मध्ये चिपळुणात राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा झाली होती.
साहसी खेळ असलेल्या मल्लखांबमधील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन न तांत्रिक मार्गदर्शन मिळावे, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची माहिती देताना नगराध्यक्षा सौ.  सुरेखा खेराडे, बांधकाम सभापती आशीष खातू, नगरसेवक विजय चितळे व छत्रपती पुरस्कार विजेते शांताराम जोशी म्हणाले की, स्पर्धेत राज्यातील 29 जिल्ह्यांचा सहभाग असून  800 खेळाडू सहभागी होतील. स्पर्धेदरम्यान 100 राष्ट्रीय पंच व 100 पदाधिका-यांचाही सहभाग असेल. क्रीडानगरीस मल्लखांबाचे चिपळूणमधील भीष्माचार्य भागवत गुरुजी क्रीडा  नगरी असे नाव ठेवण्यात येणार आहे. नवोदित तसेच अनुभवी खेळाडूंमध्ये मल्लखांबविषयी विचारमंथन व्हावे, यासाठी स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडूंचा मेळावा होईल. स्पर्धेतून 100  खेळाडूंची निवड केली जाणार आहे. मुले व मुलींमध्ये एकूण चार गटात ही स्पर्धा होईल. यामध्ये 12, 14, 16 वर्षांखालील, तर 18 वर्षांवरील खुल्या गटाचा समावेश आहे. सकाळी  8 ते सायंकाळी उशिरापर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहेत.