Breaking News

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’प्रकरणी रायगड पोलिसांनी वसूल केला 25 लाखांचा दंड

अलिबाग, दि. 08, ऑक्टोबर - मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) कारवाई करण्याच्या रायगड जिल्हा पोलिसांच्या मोहिमेअंतर्गत वाहतूक  पोलीस शाखेमार्फत जानेवारी ते सप्टेंबर कालावधीत 25 लाख 32 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या प्रकरणी या नऊ महिन्यात 1 हजार  691 चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही रायगड वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक मनोज म्हात्रे यांनी दिली.
मद्यप्राशन करुन वाहन चालविणा-यां विरोधात रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेमार्फत जानेवारी महिन्यात मोहिम हाती घेण्यात आली होती. जिल्ह्यात वाहतूक  पोलिसांनी ‘ड्रंक अण्ड ड्राईव्ह’ प्रकरणी केलेल्या कारवाईत जानेवारी ते जुलै या 6 महिन्यांच्या कालावधीत 18 लाख 69 हजार 500 रुपये, ऑगस्ट महिन्यात 2  लाख 70 हजार 500 रुपये तर सप्टेंबरमध्ये 3 लाख 92 हजार 500 रुपये असा एकूण 25 लाख 32 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे,  अशीही माहिती त्यांनी दिली.
या प्रकरणातीळ आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय त्यांना दंड भरल्यावर सोडून देते. सध्या या गुन्ह्यासाठी असलेला दंड हा वाढवणे आवश्यक आहे.  या दंडात वाढ केल्याने शासनाला तर त्याचा नक्कीच फायदा होईल. पण मद्यपींनादेखील कारवाईची भीती बसेल, असे म्हात्रे म्हणाले.