Breaking News

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेले निर्णय नागरिकांच्या भल्यासाठीच : अमित शहा

नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने घेतलेले निर्णय हे लोकांना दिसण्यासाठी जरी चांगले नसतील, तरीही ते निर्णय लोकांच्या  भल्यासाठीच असतात, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले. ‘फिक्की’च्या वार्षिक बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
मोदी सरकारने प्रत्येक घरात शौचालय, वीज आणि गॅस कनेक्शन पोहोचवण्यासाठीचे निर्णय घेतले. त्याने सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढणार, याची तर आम्हाला खात्री  आहेच पण मुख्य म्हणजे, याने फक्त सकल राष्ट्रीय उत्पन्नच वाढणार नाही, तर देशातील लोकांचे जीवनामानही उंचावेल, असेही शहा म्हणाले.
नोटा रद्दच्या निर्णयामुळे देशाच्या औपचारिक अर्थव्यवस्थेची व्याप्ती वाढली आणि काळ्या पैशाला चाप बसला. परिणामी, गेल्या पासष्ठ वर्षांच्या काळात देशातील  प्रत्यक्ष करदात्यांची संख्या 3.7 कोटींवरून 6.4 कोटींवर गेली. हा नोटबंदीच्या निर्णयाचा परिणाम आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात  आला असून अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे, असेही शहा यांनी नमूद केले.