Breaking News

परिवार सक्षम झाल्याने महिला सक्षमीकरण आपोआप होते - मृदुला सिन्हा


पुणे,दि.8 : निसर्गाच्या नियमानुसार महिला आणि पुरुष एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे महिला व पुरुषांनी एकत्रितपणे प्रगतीपथावर चालले पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेची संकल्पना व्यापक अर्थाने समजून घेतली पाहिजे. आज महिला सर्व क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताहेत. मात्र, अनेक ठिकाणी समानता आणि त्यांना योग्य तो सन्मान मिळत नाही. त्यासाठी परिवार सक्षम झाला पाहिजे. त्यातून महिला सक्षमीकरण आपोआप होते, असे मत गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांनी केले. टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियमतर्फे (टीएमसी) विमाननगर येथील सिम्बायोसिस एज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या सभागृहात आयोजित ’चांगल्या भारतासाठी महिला सक्षमीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. मृदुला सिन्हा बोलत होत्या. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, टीएमसीचे अध्यक्ष बी. आर. मल्होत्रा, उपाध्यक्ष मुकेश मल्होत्रा, सचिव डॉ. जयसिंगराव पाटील, परिषदेच्या समन्वयक नम्रता भाटिया, नीलकंठ ज्वेलर्सचे दिलबाग सिंग, संस्कृती ग्रुपच्या संचालिका जेनीस सोमजी, सिमरन जेठवानी आदी मान्यवर उपस्थित होते.  डॉ. मृदुला सिन्हा म्हणाल्या, महिला आज चूल आणि मूल याच्यापलीकडे जाऊन काम करीत आहेत. परंतु, समाजातील वंचित आणि ग्रामीण भागातील महिला काहीशी मागे आहे. त्यांना चांगले शिक्षण, आरोग्य आणि सन्मान मिळायला हवा. त्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि स्वतःच्या पायावर उभे करणे गरजेचे आहे. भ्रूणहत्येसारख्या समस्येवर काम व्हावे. निसर्गाने महिलेला विशेष बनवले आहे. त्यामुळे दोघे समान असावेत, असा आग्रह असता कामा नये. सक्षम होताना, विकसित होण्याकडे वाटचाल करताना महिलेने आपली मूलभूत कर्तव्ये विसरू नयेत. स्त्रीवादी होण्यापेक्षा परिवारवादी होण्यास महत्व द्यावे.
मुक्ता टिळक म्हणाल्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचा उत्तम मार्ग आहे. भारतीय राजकारणात महिलांना योग्य संधी मिळत आहेत. मात्र, अजूनही पुरुष त्यामध्ये हस्तक्षेप करताना आपण पाहतो. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करण्याची मुभा मिळायला हवी. वंचित घटकातील महिलांना बळ देण्यासह मुलींमध्ये लैंगिक अत्याचाराबद्दल जागृती करण्यासाठी लवरकरच पालिकेच्या वतीने कृतिशील कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.
डॉ. मुजुमदार म्हणाले, शिस्तप्रिय, सहनशील आणि सहिष्णू असलेली महिला मुळात सक्षमच आहे. गरज असते ती त्यांना योग्य संधी आणि सन्मान देण्याची, स्वावलंबी बनविण्याची. महिला सरस्वती, लक्ष्मी आणि कालिका यांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. ती शक्तीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीने ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ चा संदेश दिला आहे. तो आपण आजच्या आधुनिक काळात जपला पाहिजे बी. आर. मल्होत्रा म्हणाले, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देणे गरजेचे आहे. कारण देशाच्या प्रगतीत महिलांचा वाटा महत्वपूर्ण असतो. त्याचबरोबर त्यांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित केले पाहिजे. चांगल्या भारताच्या निर्माणासाठी टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्टियम सातत्याने उपक्रम राबवित असते. मुकेश मल्होत्रा, नम्रता भाटिया यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. डॉ. जयसिंगराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.