अरविंद केजरीवाल पाणीपुरवठा खात्याचा कारभार स्वत:कडे घेणार?
नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पाणीपुरवठा खात्याचा कारभार स्वत:कडे घेण्याची शक्यता आहे. बवाना विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाला मिळालेल्या यशात पाणीप्रश्न हा प्रमुख मुद्दा होता. बवानामधील प्रचारादरम्यान नागरिकांनी येथील पाणी समस्या सोडवण्याच्या मागणी केली होती. निवडणुकीनंतर ही समस्या सोडवण्याच्या आश्वासनावर मतदारांनी ‘आप’ला मते दिली होती. त्यापार्श्वभूमीवर केजरीवाल हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे पाणीपुरवठा खाते आहे. सध्या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडे कोणताच विभाग नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनेकवेळा टीकाही झाली. याशिवाय गौतम यांच्या कामावर केजरीवाल नाखूश असल्याचेही सांगितले जात आहे.