Breaking News

बालहत्याकांड अजूनही थांबेना...

दि. 04, सप्टेंबर - उत्तरप्रदेशमध्ये सध्या भयावह परिस्थिती असून, 78 बालकांचे सरकारी हत्याकांड झाल्यानंतर देखील हा आकडा काही थांबण्याची चिन्हे नाहीत.  ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत तब्बल 386 बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर देखील प्रसारमाध्यमात हा विषय चर्चेचा नाही. एकंदरित हा विषय गंभीर  असून, उत्तरप्रदेश राज्य हे बालकांचे हत्याकांडाचे माहेरघर बनू पाहत असतांना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बेपर्वाईचे विधाने करतांना दिसून येत आहे.  लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले की, तुमच्या मुलांचा सांभाळ सरकार करणार का? असा संतापजनक सवाल केला.  याविधानातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची संवेदनशीलता, 70 मुलांच्या मृत्यूनंतर त्यांनी ढाळलेले अश्रू किती खोटे होते, त्यात बालहत्याकांडाचा लवलेशही  नसल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. उत्तरप्रदेशमध्ये एवढे बालहत्याकांड होऊन देखील नेमका दोष कुणाचा याचा शोध न घेता, चोर न शोधता संन्याशाला  फासावर लटकवण्याचा प्रकार सुरू आहे. नुकतीच बाबा राघवदास हॉस्पिटलचे डॉक्टर, डॉ. काफिला यांना अटक करण्यात आली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा खंडित  झाल्यानंतर धावपळ करत, ऑक्सिजनचे सिलेंडर आणणारा हाच अवलिया तेथील नागरिकांनी पाहिला. मात्र यांनी सत्य परिस्थिती सांगितल्यास योगी आदित्यनाथ  यांना पळती भुई थोडी होईल, त्यामुळेच वास्तव लपवत, त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यांत उभा करण्याचा खेळ सध्या खेळला जात आहे. मात्र तो कधीतरी अंगाशी  येणार हे नक्की, भले त्यास वेळ लागेल. उत्तरप्रदेशामध्ये मोठया समस्या आहेत. त्याकडे विद्यमान सरकारचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. उत्तरप्रदेशात बोकाललेला  भ्रष्टाचार आरोग्याच्या समस्या, शिक्षणांच्या सोयी सुविधा, लोकसंख्येची वाढ, शेतकर्‍यांच्या समस्या, मोठया प्रमाणांत असतांना योगी आदित्यनाथ आपली इमेज  बनवण्यात, स्वता:ची खोटी मॉर्केटिंग करण्यात मश्गुल असल्याचे चित्र आहे. उत्तरप्रदेशमध्ये पाऊसाने थैमान घातल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, आणि  यामुळे पुन्हा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असली, तरी हा प्रशासन आणि राज्यसरकारचा मुख्य दोष आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर साफसफाई करणे  गरजेचे असतांना, प्रशासन आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेच्या निवडणूकांच्या प्रचारासाठी व्यस्त होते. मात्र निवडणूक संपल्यानंतर देखील त्यांनी  तत्परता दाखवत साफसफाई करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही, असे असतांना देखील योगी आदित्यनाथ या बालहत्याकांडाला उत्तरदायी नसल्याच्या अविभार्वात  वागत आहे. राज्याचा मुख्यंमत्री हा त्या राज्याचा एकप्रकारचा पालकच असतो. त्यामुळे मुख्यमंत्री हा एकप्रकारे राज्यातील जनतेला उत्तरदायी असतांना, योगी  आदित्यनाथ आपली जवाबदारी झटकतांना दिसून येत आहे. 386 बालकांचा मृत्यू जर इतर पक्षांच्या सत्ताकाळात झाले असते, तर भाजपाने जंगजग पछाडले असते.  मात्र याप्रकाराविरोधात भाजपा मुग गिळून गप्प आहे. राष्ट्रीय स्तरावर देखील भाजपाच्या अध्यक्षांनी यांची नोंद न घेता, एकप्रकारे योगी आदित्यनाथ यांना अभय  दिल्याचेच चित्र आहे. बाबा राघवदास रूग्णालयात 386 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तरी सरकारच्या वतीने रूग्णालयात योग्य त्या सुविधा व उच्च दर्जांची  डॉक्टरांची फौज उभी करणे गरजेचे होते. जेणेकरून, यापुढे एकाही बालकांचा मृत्यू होणार नाही. मात्र या बालहत्याकांडाकडे गंभीरपणे घ्यायचे नाही, असेच योगी  आदित्यनाथ यांनी ठरविले असल्याचेच एंकदरित दिसून येत आहे. विविध राज्यातील पुरपरिस्थितीमुळे बालहत्याकांडाचा प्रश्‍न सुध्दा वाहून जाण्याच्या स्थितीमध्ये  आहे.