Breaking News

बाप्पांच्या विसर्जनाचीही जल्लोषात तयारी

पिंपरी, दि. 04, सप्टेंबर - भक्ती, जल्लोष, उत्साहात बाप्पांचे स्वागत केल्यानंतर आता वेळ जवळ आलीय बाप्पांना निरोप द्यायची. मन व्याकूळ होत असले तरी  आगमनाप्रमाणेच बाप्पांच्या विसर्जनाची तयारीही मोठ्या जल्लोषात सुरू आहे. मानाच्या पाचही गणपतींचे मिरवणुकीसाठीचे रथ तयार झाले आहेत. तसेच विविध  ढोल-ताशा पथक आपली कला सादर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उद्या सकाळी 10 वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे.
मानाच्या पहिल्या गणपतीच्या मिरवणूकीला उद्या (मंगळवार) सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार आहे. सकाळी 9.00 वाजण्याच्या सुमारास श्रींची मूर्ती गणपती  मंडपातून निघून टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथे येणार आहे. साधारण दहा वाजण्याच्या सुमारास महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस  आयुक्त रश्मी शुल्का, पालिका आयुक्त कुणालकुमार यांच्या हस्ते श्रींची आरती होईल व त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. मानाच्या दुसर्‍या तांबडी जोगेश्‍वरी  गणपतीची मिरवणूक सकाळी 10.00 ला सुरू होईल. महात्त्मा फुले मंडई येथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल. यावेळी पारंपररिक चांदीच्या पालखीतून श्रींची  मिरवणूक काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशात मंडळाचे महिला व पुरुष कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष  राजाभाऊ टिकार यांनी दिली. नाच्या तिसर्‍या गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी साडेदहाच्या सुमारास महात्मा फुले मंडई येथून सुरू होणार आहे. सुभाष सरपाले  आणि स्वप्नील सरपाले यांनी बनविलेला वाद्यांसहित असणारा संगीतमय फुलांचा आकर्षक रथ हे मिरवणुकीचे आकर्षण असणार आहे. मिरवणुकीत जयंत नगरकर  यांचे नगारावादन, अतुले बहेरे यांचे नादब्रम्ह पथक, चेतक स्पोर्टस क्लब पथक, शिवगर्जना ढोल पथक ही चार पथके असणार आहेत. मानाच्या चौथ्या तुळशीबाग  गणपतीची मिरवणुकीला सकाळी साडेदहाच्या सुमारास महात्मा फुले मंडईतून प्रारंभ होणार आहे. यंदा तुळशीबागचा गणपती 24 फुटी गरुड रथावर विराजमान होणार  आहे. विपुल खटावकर यांची शिल्पकला पाहावयास मिळणार आहे, अशी माहिती नितीन पंडित यांनी दिली.मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन  मिरवणुकीला साडेदहाच्या सुमारास महात्मा फुले मंडई येथून सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत बिडवे बंधूंचे सनई चौघडा वादन, श्रीराम पथक व शिवमुद्रा ढोल ताशा  पथक मिरवणुकीत असणार आहे. पारंपरिक पद्धतीने पालखीतून श्रींची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.