Breaking News

माझ्या गैरहजेरीचा अर्थ मी नाराज आहे, असा काढू नये - उमा भारती

नवी दिल्ली, दि. 04, सप्टेंबर - माझे कार्यक्रम ठरलेले असल्याने मी आजच्या शपथविधीस उपस्थित राहू शकले नाही. मात्र, मी नाराज नाही. माझ्या गैरहजेरीचा  अर्थ मी नाराज आहे, असा काढू नये, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतरच्या शपथविधी कार्यक्रमाला उमा भारती अनुपस्थित होत्या . उमा यांच्याकडे असलेले जलसंधारण व गंगा संरक्षण मंत्रालय आता नितिन  गडकरी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. उमा भारती यांच्याकडे पेयजल, स्वच्छता मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
या खाते बदलाने उमा नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यांच्या राजीनाम्याचे वृत्तही आले होते. मात्र, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देण्यास नकार दिला होता.  त्यानंतर आज त्या शपथविधी कार्यक्रमास गैरहजर राहिल्या. उमा भारती यांच्याकडे गंगा नदी संरक्षणाचे खाते देण्यात आल्यानंतरच्या तीन वर्षात अपेक्षित परिणाम  दिसून न आल्याने पंतप्रधान नाखूश होते. गंगेच्या अस्वच्छतेमुळे राष्ट्रीय हरित लवाद व न्यायालयाकडूनही सरकारवर अनेकदा टीका करण्यात आली. नमामि गंगे  योजनेच्या सुरूवातीपासूनच त्यासाठीची अर्थसंकल्पातील तरतूद व खर्च करण्यात आलेला निधी यात तफावत दिसून येत होती. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी उमा  यांच्याकडून हे खाते काढल्याचे सांगितले जात आहे.