Breaking News

ज्येष्ठ वकील जेठमलानींची निवृतीची घोषणा

नवी दिल्ली, दि. 10, सप्टेंबर - ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी अखेर आपली 75 वर्षांची कारकीर्द थांबवण्याची घोषणा शनिवारी केली आहे. सुप्रीम कोर्टाचे  मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना, त्यांनी याबाबतची घोषणा केली. बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून या कार्यक्रमाचं  आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना जेठमलानी म्हणाले की, न्यायमूर्ती मिश्रांचा मी मनापासून आदर करतो. पण आता ते न्यायमूर्ती नसतील,  याचं दु: ख होत आहे. मी देखील वकिलीमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राम जेठमलानी लवकरच वयाच्या 94 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण तरीही निवृत्तीनंतर ते आपल्या इतर कामात व्यस्त असतील याचे संकेत त्यांनी  यावेळी दिले आहेत. ते म्हणाले की, मला राजकारणातील भ्रष्टाचाराचं समुळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष उभा करायचा आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर माझ्याकडून  कायदेविषयक बाबींसाठी सल्लामसलत करणार्‍यांसाठी मी सदैव उपलब्ध असेन.