Breaking News

रविवारी पुन्हा आधार नोंदणी अभियान

पुणे,दि.8 : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्यपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयात गुरुवारी राबविण्यात आलेल्या विशेष आधार कार्ड नोंदणी अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत 1325 नागरिकांनी आधार नोंदणी व आधार दुरुस्ती करुन घेतली आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांनी दिली.पिंपरी पालिकेच्या आठही क्षेत्रिय कार्यालयात आज, गुरुवारी आधार नोंदणी व दुरुस्ती अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. येत्या रविवारी (दि.10) पुन्हा सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व क्षेत्रिय कार्यालयात विशेष आधार कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.नवीन आधार कार्ड नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परंतु यापूर्वी काढण्यात आलेल्या आधार कार्डमध्ये दुरुस्तीसाठी 25 रुपये शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आकारण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी, मोनिका सिंग, सह आयुक्त दिलीप गावडे, यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालायांना भेट देऊन या मोहिमेची माहिती घेतली. या अभियानामध्ये नवीन आधार कार्डची नोंदणी व यापूर्वी काढलेल्या आधार कार्ड मधील दुरुस्ती करण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत क्षेत्रिय कार्यालयनिहाय आधार मशिन किट ऑपरेटरसह उपलब्ध करुन दिले आहे.शहरातील नागरिकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आधार नोंदणी व आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी आपल्या नजीकच्या महापालिका क्षेत्रातील ’अ’, ’ब’, ’क’, ’ड’, ’इ, ’फ’ ’ग’ आणि ’ह’ या क्षेत्रिय कार्यालयात संपर्क साधून अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.