Breaking News

राज्यातील मंदिरांमधील धन सरकार जमा करा -डॉ. सुभाष देसाई

सांगली, दि. 12, सप्टेंबर - राज्यातील सर्व मंदिरांतील धन राज्य शासनाने जमा करून घ्यावे व त्यातून शेतक-यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी, असे  प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष देसाई यांनी केले. पंढरपूरप्रमाणेच मंदिर नियोजनाचे धोरण राज्यातील सर्व मंदिरांसाठी लागू करावे व ही मंदिरे  पुजा-यांच्या ताब्यातून मुक्त करून तिथे सरकारी पगारी नोकर नेमावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा सेवा संघाच्या सांगली जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित व्याख्यानात डॉ. सुभाष देसाई बोलत होते. कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव  लढा हा धार्मिक स्वातंत्र्य व जातीअंताचा लढा आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही, हे केंद्र व राज्य शासनाने समजून घ्यावे. केवळ आपल्या  स्वजातीच्या मूठभर लोकांच्या हितासाठी बहुजन समाजाला विनाकारण वेठीस धरू नये, अशी सूचनाही त्यांनी केली.
राज्यातील सर्व मंदिरांतील धन समोर आले, तर सर्वांच्याच हिताचे निर्णय घेता येणार आहेत. धर्माच्या नावावर अडकलेल्या या पैशाचा राज्य शासनाने तातडीने शोध  घ्यावा. त्यासाठी राज्य शासनासमवेत आम्हीही सहभागी होण्यास तयार आहोत. हा पैसा सर्वसामान्यांसह शेतक-यांच्या हिताकरिता वापरला जाऊन हे राज्य पुन्हा  एकदा सुजलाम सुफलाम होण्यास मोठी मदत होणार आहे.
वैज्ञानिक दृष्टीकोन, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता व समाजवाद या मूल्यांना तिलांजली देऊन धार्मिक दहशतवाद जोपासला जात आहे. हिटलरने पत्रकार व  विचारवंत यांचा विरोध मोडण्यासाठी त्यांच्या हत्या केल्या, त्याच दिशेने या देशाची सध्या वाटचाल सुरू आहे. पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या हे त्याचेच उदाहरण  आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आता पुन्हा एकदा स्वातंत्र्य लढा उभारावा लागणार आहे. धार्मिक गुलामगिरीतून ब्राम्हणेत्तरांना सोडवावे लागणार आहे. छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या नावे मराठा समाजाला मुस्लिम समाजाविरोधात लढविले जात आहे, या प्रवृत्तीपासूनही प्रत्येकाने सावध रहावे, असे आवाहनही डॉ. सुभाष  देसाई यांनी केले.