Breaking News

मिरजेचा अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव 21 सप्टेंबरपासून

सांगली, दि. 12, सप्टेंबर - मिरज शहरातील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे उदघाटन 21 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील  यांच्याहस्ते होणार आहे. यंदाच्या संगीत महोत्सवात अमेरिकेतील वॉशिंग्टनयेथील नॅश न्युबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे.
नवरात्रीनिमित्त 21 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजित श्री अंबाबाई संगीत महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार गायन- वादन व नृत्य सादर करणार आहेत. या  संगीत महोत्सवाचे उदघाटन दि. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी विजयकुमार काळम- पाटील यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ व सुरेश  खाडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात मराठी पार्श्‍वगायिका उत्तरा केळकर यांना संगीतकार राम कदम पुरस्काराने, तर तबलावादक धनश्री नागेशकर (मुंबई)  यांना डॉ. अबन मेस्त्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या संगीत महोत्सवात पंडित हरिप्रसाद चौरासिया यांचे अमेरिकेतील शिष्य नॅश न्युबर्ट यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम दि. 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. संगीत  रसिकांसाठी मेजवानी असलेल्या या संगीत महोत्सवाचा समारोप उपजिल्हाधिकारी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात सुभाष  सव्वाशे यांना अंबाबाई संगीत सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या संगीत महोत्सवाचे संयोजन मधू पाटील, विनायक गुरव, संभाजी भोसले, डॉ. शेखर  करमरकर व बाळासाहेब मिरजकर आदींनी केले आहे.