Breaking News

कवठेमहांकाळ तहसिलदारांची वाळू तस्करांवर धडक कारवाई

सांगली, दि. 12, सप्टेंबर - कवठेमहांकाळ विभागाच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने जत, आटपाडी व  कवठेमहांकाळ या तीन तालुक्यातील बेकायदेशीर वाळू साठ्यांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 446 ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून या वाळू  तस्करांना तीन कोटी 77 लाख रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्यापाठोपाठ आता शिल्पा ठोकडे यांनीही धडक मोहिम हाती घेतल्याने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.  शिल्पा ठोकडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने ही धडक मोहिम राबवली.
या मोहिमे अंतर्गत सर्वात मोठी कारवाई जत तालुक्यातील संख, खंडनाळ, करजगी व हळ्ळी या गावात करण्यात आली. बोर नदीपात्रातून बेकायदेशीर उपसा करून  साठा केलेली 446 ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त केली. याप्रकरणी 27 वाळू तस्करांना दोन कोटी 11 लाख 31 हजार 100 रूपयांचा दंड करण्यात आला आहे.  हळ्ळी गावात 94 ब्रास वाळू साठा जप्त केला असून जंगाप्पा सातपुते, चंदू कोळी, बसवराज पाटील, राजकुमार सातपुते, अरविंद खवेकर, संपत खवेकर व राजू  मुदीमणी (सर्व रा. हळ्ळी) या सातजणांना नोटिस बजावली आहे. करजगी गावात 64 ब्रास वाळू साठा जप्त करून जयवंत कलबुर्गी, शाबू पट्टणशेट्टी, निंगाप्पा जेऊर,  महादेव पट्टणशेट्टी, अशोक दळवाई व सुरेश रवी (सर्व रा. करजगी) अशा सहाजणांना नोटिस दिली आहे. त्यापाठोपाठ संख व खंडनाळ या परिसरातही 288 ब्रास  वाळू साठा जप्त केला असून विठ्ठल लोहार, हणमंत पाटील, अंबू बसर्गी, श्रीशैल कलादगी, शांतू गुजरे व अनिल बिराजदार (सर्व रा. संख) व श्रीशैल वज्रशेट्टी, सुरेश  पाटील, तम्मा कुलाळ, दत्ता पाटील, भारत टेंगले, सुरेश मोटे, विठ्ठल सर्जे व अन्य एकजण (सर्व रा. खंडनाळ) अशा 14 जणांना नोटिस देण्यात आली आहे.
या कारवाईत जत विभागाचे प्रांताधिकारी शंकर बर्गे, तहसिलदार अभिजित पाटील, नायब तहसिलदार ए. बी. भस्मे, मंडल अधिकारी नंदकुमार बुकटे, अरूण कणसे  व गावकामगार तलाठी आर. एच. कोरवार, गणेश पवार व विशाल उदगिरे आदींनी भाग घेतला.