Breaking News

कांद्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत किलोमागे 5 रुपयांनी घसरण

पुणे, दि. 12, सप्टेंबर - कर्नाटक येथील लाल कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातून कर्नाटक आणि दक्षिणेकडील राज्यात असलेली मागणी घटली  आहे. त्यातच भाव एकदमच घसरतील, या भीतीने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणला आहे. त्यामुळे गगनाला भिडलेल्या कांद्याच्या भावात गेल्या  आठवड्याच्या तुलनेत किलोमागे 5 रुपयांनी घसरण झाली आहे. तरीही किरकोळ व्यापारी मात्र अजूनही चढ्या भावाने कांदा विकत आहेत. याचा फटका ग्राहकांना  सहन करावा लागत आहे. 
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कांद्यास प्रती किलोस 12 ते 17 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. एकीकडे सर्वसामान्य  नागरिकांना दिलासा मिळत असला तरीही कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी येथील मार्केट यार्डातील कांदा  विभागात तब्बल 150 ट्रक कांद्याची आवक झाली. रविवारी मार्केटयार्डात कांद्याची आवक नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर भागातून आणि पुणे जिल्ह्यातून खेड,  मंचर, जुन्नर आणि शिरूर येथून झाली. वखारींमध्ये साठवून ठेवलेला जुना साठवूण ठेवलेला कांदा सध्या बाजारात विक्रीला येत आहे. त्यामुळे आवक होणार्‍या  कांद्याचा दर्जाही काही प्रमाणात खालावला आहे. बाजारात येणार्‍या कांद्यापैकी 30 ते 40 टक्के कांदा हा चांगल्या प्रतिचा असून उर्वरित कांद्याचा दर्जा खालावलेला  आहे. खालावलेल्या कांदा परराज्यातील व्यापारी खरेदी करत नाहीत. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. परिणामी कांद्याचे भाव  कमी झाले आहेत. नाशिक आणि राज्यातील इतर कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या बाजार समितीमधून मोठ्या प्रमाणात कांदा बिहारला निर्यात होत असतो.
मात्र, मागील काही दिवसांपामध्ये बिहारमध्ये पूर आला होता. त्यामुळे तेथूनही कांद्याची मागणी घटली आहे. या सर्व परिणामांमुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत.  पुढील पंधरा ते वीस दिवस अशीच परिस्थिती राहिल, असा अंदाजही पोमण यांनी वर्तविला आहे.