Breaking News

नोटाबंदीचा हेतू साध्य अर्थमंत्री जेटली

नवी दिल्ली, दि. 31, ऑगस्ट - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच किती पैसा जमा झाला, याची आकडेवारी जाहीर केली. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रुपयांपैकी 15.28 लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले. तर 1000 च्या नोटांमध्ये केवळ 8 हजार 900 कोटी रुपयेच जमा झाले, अशी माहिती आरबीआयने दिली आहे.
नोटाबंदीचा उद्देश हा पैसा जमा करणं नव्हता, तर कर वाढवणं, दहशतवाद, नक्षलवाद रोखणं, नगदी व्यवहार कमी करणं, डिजिटायझेशन करणं आणि काळा पैसा रोखणं हा होता आणि यामध्ये बदल झाला आहे, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला. आरबीआयने आकडेवारी जाहीर केल्यानंतर जेटलींनी पत्रकार परिषदेद्वारे याबाबत माहिती दिली. नगदी व्यवहार कमी करणं हा नोटाबंदीचा हेतू होता. नोटाबंदीनंतर आतापर्यंत नगदी व्यवहार जवळपास 17 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे नोटाबंदीचा उद्देश साध्य झाला आहे. भविष्यातही या निर्णयाचा फायदा होईल. आता भविष्यात निवडणुकांमधील काळा पैसा रोखणं हे सरकारचं उद्दीष्ट असल्याचंही जेटलींनी सांगितलं. बँकांमध्ये पैसा जमा करणं हा नोटाबंदीचा उद्देश होता, अशी टीका केली जात आहे. मात्र ज्यांना काळा पैसा कसा रोखायचा याबाबत माहिती नाही, त्यांच्याकडूनच अशी टीका केली जात असल्याचं जेटली म्हणाले.
नोटाबंदीमुळे नगदी व्यवहार कमी झाले आणि नोटांचं प्रमाणही कमी झालं. त्यामुळे छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाया आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण कमी झाल्याचा दावा जेटलींनी केला.