Breaking News

लोकपालसाठी अण्णा हजारेंचे दिल्लीत उपोषण

मुंबई, दि. 31, ऑगस्ट - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत. देशभरात लोकायुक्तांची नियुक्ती व्हावी, तसेच शेतकर्‍यांबाबतच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, यासाठी ते उपोषण करणार आहेत. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज पत्र लिहिलं आहे.
सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी मोदी सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्‍चित असा कायदा करण्यात आलेला नाही. अशा शब्दात अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न पाहत 2011 साली दिल्लीच्या रामलिला मैदानावर देशव्यापी आणि ऐतिहासिक आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल घेत 27 ऑगस्ट 2011 रोजी संसदेत ‘सेन्स ऑफ हाऊस’ नावाने ठराव पास करण्यात आला. ज्यामध्ये केंद्रात लोकपाल, राज्यात लोकायुक् आणि सिटिझन चार्टर यांची नियुक्ती करण्याबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कायदा बनवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र आज सहा वर्षांनंतरही देशात भ्रष्टाचार रोखणार्‍या एकाही कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. असं अण्णा हजारेंनी पत्रात म्हटलं आहे.