Breaking News

गणपतीबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचेही पुनरागमन

रत्नागिरी, दि. 26, ऑगस्ट - देवरुख, ता.25 : सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात मुसळधार पावसानेही दमदार आगमन केले. भर  पावसात घरोघरी वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले. जिल्ह्यात एक लाख 67 हजार घरगुती आणि 112 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतीचे आज पूजन झाले.  आज चतुर्थी असल्याने कालपासूनच गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली. काल संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. मात्र त्याचा मोठा जोर नव्हता. आज  सकाळपासून पावसाने दमदार सुरुवात केली. जिल्ह्याच्या अनेक भागात जोमदार पाऊस पडला. सकाळपासून सरींवर सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाण्याची  पातळीही वर आली आहे. पावसाच्या जोरामुळे उत्सवासाठी दाखल झालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्याही स्थितीत बाजारातील गर्दी मात्र आजही कायम होती.  अनेक ठिकाणी वाजत गाजत मिरवणुका काढून घरोघरी गणपती दाखल झाले. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करण्यात आली. रत्नागिरीत श्री रत्नागिरीचा राजा या  सार्वजनिक गणपतीची पूजा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी पार पडली.