Breaking News

जि.प.च्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यामध्ये तीनहजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोकादायक ईमारतीमध्ये

नेवासा, दि. 31, ऑगस्ट - जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यामध्ये 20 शाळेतील 3 हजार विद्यार्थी धोकेदायक वर्गांमध्ये शिक्षण घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून शिक्षण विभागाच्या प्रस्तावावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी अक्षमी दुर्लक्ष करीत सदरच्या खोल्या पाडण्याचा अहवालाच दिलेला नाही.
निंबोडीच्या घटनेनंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा खोल्यांचा आज आढावा घेत आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगले धारेवर धरले आहे. सर्वच शाळांमधील खोल्यांचे स्ट्रक्चरल ओडीट करण्याचे आदेश दिले. कारण 2014-15 पासून तालुक्यातील 20 शाळांच्या 38 खोल्या पाडण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलेले आहे. तर 26 शाळांमधील 52 खोल्यांच्या दुरुस्ती प्रस्तावाकडे देखील यांनी दुर्लक्ष केले आहे.
जिल्हा परिषद शाळेत 54 हजार 708 विद्यार्थी तालुक्यात 253 शाळा आहेत. एकूण खोल्या 1 हजार 57 आहेत त्यात सिमेंटच्या 477 आणि दगडी बांधकाम 580 खोल्यांचे आहे. त्यापैकी20 शाळांच्या 38 खोल्या धोकादायक असल्याने पाडणे गरजेचे आहे तर 26 शाळांतील 52 खोल्या दुरुस्ती करण्याची गरज आहे. या सर्व दुरुस्ती व पाडण्याचे प्रस्ताव 2014 पासूनच दिलेले आहेत. तर मोरेचिंचोरे, रस्तापूर, जायगुडे वस्ती शाळेतील 5 खोल्या पाडण्याचे प्रस्तावाच अद्याप शिक्षण विभागाकडून दाखलच नाहीत. याशिवाय तालुक्यामध्ये 14 शाळां साठी 29 नवीन खोल्यांची आवश्यकता असल्याचीही माहिती पुढे आली आहे आणि त्यात 6 शाळांमधील 12 वर्ग हे अशा पर्यायी जागेत बसवले जातात की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना जाब विचारला व त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.