Breaking News

शेवगाव - साकुळा नदीतील बंधा-याचे जलपूजन

शेवगाव, दि. 31, ऑगस्ट - तालुक्यातील आदर्श गाव  अमरापूर ( ता. शेवगाव ) येथे साकुळा नदीवरील बंधा-यातील पाण्याचे जलपूजन रोटरी क्लबचे अध्यक्ष भागनाथ काटे, डॉ. गणेश चेके व सरपंच विजयराव पोटफोडे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांच्या हस्ते बुधवार ( दि. 30 ऑगस्ट  ) रोजी झाले. ग्रामस्थांचा लोकसहभाग, गंगामाई साखर कारखाना व रोटरी क्लबची मदत याद्वारे साकुळा नदीतील गाळ काढण्यात आला होता.  दि. 20 ऑगस्ट रोजीच्या पावसात हा बंधारा पाण्याने भरला होता. या वेळी   सरपंच पोटफोडे  म्हणाले,   साकुळा नदीतील बंधा-यातील गाळ काढण्यासाठी गंगामाई साखर कारखाना व रोटरी क्लबने मदतीचा हात दिला. काही ग्रामस्थांनी जेसीबी, ट्रॅक्टर विनामोबदला उपलब्ध करून दिले. ग्रामस्थांनीही योगदान दिल्याने या बंधा-यात चांगला पाणीसाठा झाला. 
 डॉ. चेके म्हणाले,  राळेगण सिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांचा ग्रामविकासाचा आदर्श घेऊन राज्यात  अमरापूर गावासारखी ग्रामविकासाची बेटं उभी राहत  असून हा महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ आहे.  येथील गावक-यांनी एकजूट दाखवत विकासाला चालना दिली आहे.  महिलांचाही विकासकामांतील सहभाग लक्षणीय आहे.   भागनाथ काटे म्हणाले, रोटरी तर्फे साकुळा नदीच्या खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामासाठी जेसीबी मशीन जानेवारी महिन्यात उपलब्ध करून देऊ.   जलपुजन प्रसंगी गंगामाई कारखान्याचे रमेश कचरे, शरद  वाणी,   वसंत चौधरी,  माजी सरपंच सुरेश चौधरी,  जलसंपदाचे अभियंता शिवाजी भगत, सुरेश पाटेकर, बाळासाहेब सुसे, सुरेश पाटेकर, ग्रामसेवक अण्णासाहेब नजन,  बाळासाहेब शिंदे, नामदेव भूकन, सदाशिव कळमकर, काकासाहेब म्हस्के, बाळासाहेब म्हस्के, दिलीप पोटफोडे, अरूण बोरूडे, सुभाष अडसरे,  दिलीप पोटफोडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष भागचंद खैरे,  वंदना चौधरी, संगीता पोटफोडे, ज्योती बोरूडे, मनिषा दिवटे, संध्या पोटफोडे, रंजना खरात, रेणूका कळमकर, शोभा सुसे, शंकुतला शिंदे, अनिता सुसे, शारदा बोरूडे यांच्या सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने  उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन बाळासाहेब सुसे यांनी केले.
जलसंवर्धनासाठी साकुळा प्रकल्प - अमरापूर गावातून साकुळा नदी जाते. या नदीतून पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून जलयुक्त शिवार योजना राबवायची. नदीतील तीन किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण व रूंदीकरण, नदीवर बंधा-याची मालिका व परिसरात शंभर शेतळे उभारायची असा नियोजित साकुळा प्रकल्प असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी दिली. या प्रकल्पासाठी कोणताही शासकिय निधी उपलब्ध नसून लोकसहभाग, रोटरी क्लब व गंगामाई साखर कारखान्यासह विविध  स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याद्वारे हा पुर्णत्वाकडे  नेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.