Breaking News

वैमानिकाला ह्दय विकाराचा झटका; कतार एअरवेजचे विमान तात्काळ उतरवले

हैदराबाद, दि. 27, ऑगस्ट - वैमानिकाला ह्दय विकाराचा झटका आल्याने कतार एअरवेजचे येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज तात्काळ  उतरवावे लागले. क्यूआर 964 डीओएच-डीपीएस या क्रमांकाचे विमान दोहा येथून उड्डाण करून डेन्सपार (इंडोनेशिया ) येथे जाणार होते. या विमानात  कर्मचा-यांव्यतिरिक्त 240 प्रवासी होते.
वैमानिक एंड्रे दिनू (वय 34) यांनी प्रवासादरम्यान अचानक ह्दय व फुफ्फुसात दुखत असल्याचे सांगितले. यावर सहवैमानिकाने विमान तात्काळ उतरवण्यासाठी  राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वाहतूक नियंत्रण विभागाशी संपर्क साधून परवानगी मागितली. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास हे विमान उतरवण्यात  आले. विमानतळावर उपलब्ध असलेल्या डॉक्टरांनी दिनू यांची तात्काळ तपासणी केली असता त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे निदान केले. त्यानंतर त्यांना मध्यरात्री  दीड वाजण्याच्या सुमारास जुबिली हिल्स परिसरातील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले. आता दिनू यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
कतार एअरवेज प्रशासनाकडून तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास विमान डेन्सपार येथे जाण्यासाठी रवाना केल्याची  माहिती विमानतळ प्रशासनाच्या प्रवक्त्यांनी दिली.