Breaking News

विदेश भवनाच्या माध्यमातून परराष्ट्रसंबंधीच्या सर्व सुविधा एकाच छताखाली : सुषमा स्वराज

मुंबई, दि. 28, ऑगस्ट - गतिमान कारभार, लोकाभिमुख व स्वच्छ प्रतिमा या त्रिसुत्राच्या माध्यमातून परराज्यातआणि देशातील नागरिकांना सन्मानाची वागणूक  मिळवून देण्यात केंद्र शासनाला यश आले असून देशात गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्बल 235 नवीन पासपोर्ट कार्यालये निर्माण करण्यात आली असल्याचे केंद्रीय  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे सांगितले. 
वांद्रे कुर्ला संकुलातील पहिल्या विदेश भवनाचे उद्घाटन केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात  आले. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (सेवानिवृत्त) डॉ. विजय कुमार सिंह, दिव-दमण व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, मुंबई महानगरपालिकेचे  महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, परराष्ट्र विभागाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीमती सुषमा स्वराज म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षात 50 हजार नागरिकांची सुटका करून त्यांना मायदेशी परत आणण्यात केंदशासनाला यश आले आहे. 2014  पर्यंत केवळ 77 पासपोर्ट कार्यालये देशात होती, मात्र गेल्या सहा महिन्यात यामध्ये तब्बल 235 नवीन पासपोर्ट कार्यालयांची उभारणी केंद्र शासनाने केली आहे.  प्रत्येक राज्यात विदेश भवन उभारून परराष्ट्रसंबंधीच्या सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत. पासपोर्ट कायद्यातील सुधारणा करून त्यातील अनावश्यक व  अव्यवहारी नियम काढून टाकण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.