Breaking News

जि.प.सदस्य केदार एकडे यांच्या दारुविक्री केंद्राविरुद्ध महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - बंसीलालनगरात सुरू असलेल्या जिल्हा परिषद सदस्य केदार एकडे यांचे कल्याण नावाच्या दारू विक्री केंद्राविरुद्ध आंदोलन करूनही  अधिकारी सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली येत कारवाई करत नाहीत. त्यामुळे मलकापूर येथील आंदोलनानंतर सोमवारी 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी  कार्यालयासमोरच महिलांनी आंदोलन सुरू केले. यासंदर्भात कारवाई झाल्यास मलकापूरमधील दारूचे दुकान तोडो आंदोलन करण्याचा इशारा दिला. 
महिलांच्या विनंतीलाही न जुमानता दारूचे दुकान सुरू ठेवून पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर जनतेला वेठीस धरण्याचे काम करीत असल्याचा आरोपही निवेदनातून  करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रेमलता सोनोने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू केले. याबाबत विविध विभागाला दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, मलकापूर  ग्रामीणमधील बंसीलाल नगर रोडवरील चिंतामणी नगरात जि. प. सदस्य केदार एकडे यांनी वस्तीत विना परवानगी दारूचे दुकान सुरू केले आहे. हा रस्ता रहदारीचा  असून विद्यार्थी, विद्यार्थिनी महिलांना या दुकानामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बंसीलाल नगरातील हनुमान  मंदिरात येणार्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या दुकानाच्या एनओसीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे  मिळत आहेत. खोटी उत्तरे देऊन जनतेची फसवणूक केली जात आहे. पालकमंत्रीही या प्रकाराला जबाबदार असल्याची शंका निवेदनातून व्यक्त करण्यात आली.  कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे दारूचे दुकान बंद करावे. पाच दिवसात निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला.  याप्रकरणात जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा झाली असून, ते काहीतरी निर्णय घेण्याची अपेक्षा महिलांना आहे. त्यानंतरही भर वस्तीत दारूचे हे दुकान सुरू राहिल्यास दुकान  तोडण्यासाठी महिला सक्षम आहेत. या पूर्वी महिलांवर बॉटल फेकण्याचा हिडीस प्रकारही घडला आहे, अशी माहिती प्रेमलता सोनुने यांनी दिली.