Breaking News

कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा : संतोष डाबरे

बुलडाणा, दि. 31, ऑगस्ट - शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून कृषी विभाग कार्यरत आहे. या योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ  घेवून समृद्धी साधावी.  जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आदी महत्वाकांक्षी योजना राज्य शासन राबवीत  आहे. तसेच जमिनीचे आरोग्य तपासण्यासाठी मृद आरोग्य पत्रिका वितरण अभियान राबविण्यात येत आहे. या पत्रिकेचा उपयोग करून शेतकर्‍यांनी पीक नियोजन  करावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातंर्गत जिल्हा माहिती कार्यालय, बुलडाणा यांच्यावतीने गणेशोत्सव काळात संवादपर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तेलीपूरा देऊळघाट, श्री अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ दहीद बु आणि दहीद खु गणेश मंडळ यांच्या सहकार्याने संवादपर्व  कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, धाडचे मंडळ कृषी अधिकारी श्री. जाधव, माहीती सहाय्यक नीलेश तायडे, सामाजिक  कार्यकर्ता गणेश सोनुने आदी उपस्थित होते.
  सर्वप्रथम देऊळघाट येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी नीलेश तायडे यांनी संवादपर्व कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अशा  कार्यक्रमांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवीण्याचा उद्देश आहे. कृषी विभागाच्या योजनांची माहिती कृषी विभागाचे अधिकारी देणार आहेत.  अशाचप्रकारे अन्य विभागांच्या योजनांची माहिती संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून देण्याचे नियोजन आहे. देऊळघाट, दहीद बु  येथे गणेशोत्सव मंडळाच्याजवळ  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तर दहीद खु येथे ग्रामपंचायत भवनात कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी गणेश सोनुने यांनी ग्रामस्थांना कार्यक्रमाचा उद्देश  सांगितला. योजनांसोबतच संतोष डाबरे यांनी सद्यपरिस्थितीत पीकांवर येत असलेली कीड व त्यापासून मिळवायचे नियंत्रण याविषयी माहिती दिली. आरोग्य  पत्रिकांवरील माहीतीच्या अनुषंगाने पीक घेण्याचा सल्लाही दिला.
मार्गदर्शनानंतर शेतकर्‍यांना येत असलेल्या अडचणी, शंका यांचे निरसन करण्यात आले. शेतकर्‍यांनी कर्जमाफी योजना, पिकांवरील कीड व यांत्रिकीकरण याविषयी  विविध प्रश्‍न मांडले. या सर्व प्रश्‍नांचे निरसन करून समाधान करण्याचे काम या संवादपर्व कार्यक्रमांमधून करण्यात आले. दे.घाट येथील कार्यक्रमाला मंडळाचे  पदाधीकारी, शेतकरी बांधव उपस्थीत होते. दहीद बु येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरीक व दहीद खु येथे ग्रामपंचायत पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी तसेच  शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ व अधिकार्‍यांचे आभार नीलेश तायडे यांनी मानले. कार्यक्रमांना नागरीकांचा उत्तम प्रतीसाद मिळाला.