Breaking News

गुरमीत राम रहिम सिंग खटल्याच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर हरियाणाला पोलीस छावणीचे स्वरूप

चंदीगढ, दि. 24, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंग यांच्या विरोधातील साध्वी लैंगिक शोषण प्रकरणी 25 ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण  विभागाचे न्यायालय निर्णय देणार आहे. या पार्श्‍वभूमीवर पंचकुला परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून कोणतीही घटना घडू नये, यासाठी सर्व जिल्ह्यांत  144 कलम लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे निम लष्करी दलाच्या 115 तुकड्या पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयाचे आदेश येण्याआधीच गुरमीत राम रहिम सिंग यांचे समर्थक पंचकुला परिसरात एकत्र होत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची  शक्यता राज्य सरकारकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी सरकारी इमारती व शाळा, महाविद्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही संशयित व्यक्तीची  चौकशी करून त्याला तात्काळ अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे हरियाणाच्या गृह विभागाचे सचिव रामनिवास यांनी सांगितले.