Breaking News

भटके विमुक्तांच्या प्रश्‍नांनासाठी रस्त्यावर उतरावे लागेल- प्रा. राठोड

राज्यव्यापी भटके विमुक्त अधिकार परिषद उत्साहात 

जामखेड, दि. 31, ऑगस्ट - भटके विमुक्तांच्या प्रश्‍नावर चर्चा करण्याबरोबरच प्रत्यक्ष कृती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. कारण जोपर्यंत आपण आपले प्रश्‍न रस्त्यावर येऊन मांडणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन भटके विमुक्तांचे जेष्ठ नेते प्रा. मोतीराज राठोड यांनी केले. 
विविध सामाजिक संघटनांच्यावतीने जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी भटके विमुक्त अधिकार परिषदेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भरत विटकर, निमंत्रक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव, स्वागताध्यक्ष भालचंद्र सावंत, संतोष जाधव, बापू ओहळ, शैला यादव, बबन पवार, अनिता कांबळे, काजोरी पवार, द्वारका पवार, रामकृष्ण माने, इकबाल पेंटर, महेंद्र रोकडे आदी उपस्थित होते.
जातीच्या प्रतिकात्मक भिंती तोडून व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून या परिषदेचे औपचारिक उदघाटन करण्यात आले. सूर्यकांत कांबळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी बोलतांना प्रा. मोतीराज राठोड म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे उलटली तरी संविधानाने दिलेले अधिकार अजूनही दलित आदिवासी व भटक्यापर्यंत पोहचले नाहीत. अजूनही या देशातील 20 कोटी लोक संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारापासून वंचित आहेत. जातीच्या भिंती आम्ही तोडल्या, मात्र स्वातंत्र्य मिळूनही आमचा संघर्ष अजूनही संपलेला नाही. अजूनही आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारासाठी लढावे लागते. अलीकडच्या काळात तर जातीवाद लोकशाहीला संपवतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी भरत विटकर, बबनराव पवार, आप्पा राठोड, गुलाबराव वाघमोडे व इकबाल पेंटर यांचीही भाषणे झाली. निमंत्रक अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी प्रास्तविक केले. बापू ओहळ यांनी सूत्रसंचालन केले. दघाटन सत्रानंतर गुन्हेगार जमाती कायदा आणि परिणाम, भटके विमुक्त जमातीची सद्य स्थिती आणि आव्हाने, भटके विमुक्त महिला व मुलांचे शिक्षण याविषयावर परिसंवाद झाले. या परिषदेस भटके विमुक्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी संतोष जाधव यांनी आभार मानले.