Breaking News

पावसाने गाठले शतक; अतिरिक्त पावसामुळे पिकांचे नुकसान

भुतवडयासह चार तलाव ओव्हरफ्लो

अहमदनगर, दि. 31, ऑगस्ट - शहरासह जामखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या भुतवडा तलावासह रत्नापूर धोत्री नायगाव हे तलाव 100%  पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या तलावात पाणी ओव्हरफ्लो झाले आहे. तालुक्यात झालेल्या अतिरिक्त पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त आहेत.   
जामखेडसह नायगाव, खर्डा, आरणगाव, नान्नज  या महसुली गावासह संपूर्ण परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या भुतवडा तलावासह तालुक्यातील सर्व तलावातील पाणी साठयात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे तर नदी-नाले दूथडी वाहिले असून अनेक ठिकाणी विहीरीही ओव्हरफ्लो झाल्या आहेत. त्याचप्रमाणे जलयुक्तशिवार योजनेतून झालेल्या छोट्या बंधार्यांच्या पाणी साठयात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दि. 30 रोजी  तालुक्यातील तलावातील पाणीसाठयाची शासकीय नोंदीप्रमाणे  भूतवडा- 100%, रत्नापूर-100%, धोत्री-100%, धोंडपारगाव- 9 3.28%, नायगाव- 100%, तेलंगशी- 6.93%, मोहरी- 38.98%, पिंपळगाव आळवा-  93.86,%  जवळके- 3.67%, त्याचप्रमाणे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सांगवी- निरंक, पिंपरखेड- 23.40%,  जवळा- 43.25%, कवडगाव- 50.71%, गिरवली- 22.78%  अशा प्रकारे पाणीसाठयांची नोंद झाली आहे.
त्याचप्रमाणे गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या उडदाला कर्हे तर काढून ठेवलेल्या उडीदाचे खत झाले आहे. चांगला पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. मात्र अवेळी जोरदार पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पीकांचे नूकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.