Breaking News

भोंदू साधू आणि आंधळे हे जन

दि. 28, ऑगस्ट - हरियाणातील सिरसा शहरातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमित रामरहीम सिंग याला आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल   केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. डेरा सच्चा सौदाच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यातून सार्वजनिक मालमत्तेची नुकसान  भरपाई केली जावी,  असा आदेश पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने दिला. सोमवारी (28 ऑगस्ट) गुरमीत सिंग यांना शिक्षा सुनावली जाईल. रामरहीमला अटक  केल्यामुळे त्याच्या समर्थकांनी 300 ठिकाणी दंगल माजवली आणि घडलेल्या हिंसाचारात 42 जण ठार तर 300 जण जखमी झाले आहेत.
हरियाणातील सिरसा शहरातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमित रामरहीम सिंग याला आश्रमातील दोन साध्वींवर बलात्कार केल्याबद्दल  केंद्रीय अन्वेषण  विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले आहे. डेरा सच्चा सौदाच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यातून सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई केली  जावी,  असा आदेश पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने दिला. सोमवारी (28 ऑगस्ट) गुरमीत सिंग यांना शिक्षा सुनावली जाईल. रामरहीमला अटक केल्यामुळे  त्याच्या समर्थकांनी 300 ठिकाणी दंगल माजवली आणि घडलेल्या हिंसाचारात 42 जण ठार तर 300 जण जखमी झाले आहेत.
यावरून पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ‘राजकीय फायद्यासाठी तुम्ही संपूर्ण शहर जाळू दिले. जमावासमोर प्रशासनाने गुडगे  टेकल्यासारखेच दिसत होते.’, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. धार्मिक झुंडीची ताकद वाढत असून लोकशाहीच्या दृष्टीने हे घातक आहे. या रंगेल बाबाने  काही चित्रपटांची निर्मिती करून त्यात कामही केले आहे. त्याच्या गाण्यांच्या सीडीजदेखील आहेत. या बाबाला पॉश आणि महागड्या टु- व्हिलर व फोर व्हिलरची  आवड असून त्याचे स्वतचे चार्टर विमानदेखील आहे. अशा भोंदू साधूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. समाजात चांगल्या प्रवृत्ती शिल्लकच राहिल्या नाहीत  की काय, अशी यामुळे शंका येत आहे. संत तुकाराम एके ठिकाणी म्हणतात, ‘दगडाची नाव आधींच ते जड। ते काय दगड तारू जाणे॥  तुका म्हणे वेष विटंबला  त्यांनीं। सोंग संपादणी करती परी ॥ ’संत तुकारामांनी भोंदू साधूंबद्दल , त्यांच्या लक्षणांबद्दल सुमारे 400 वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. लोक अशा भोंदूंच्या नादी लागून  कोणते अध्यात्म साधतात, हेच कळत नाही.
डेरा सच्चा सौदाची स्थापना बलुचिस्तानमधील शाह मस्ताना यांनी 1948 साली केली. मस्ताना यांच्यानंतर शहा सतनाम हे डेरा प्रमुख होते. गुरमीत राम रहीम सिंग  याने वयाच्या तेवीसाव्या वर्षी 1990मध्ये  ‘डेरा’ची सूत्रे घेतली. राजस्थानातील श्रीगंगानगर जिह्यातील श्री गुरूसर मोडिया गावी 15 ऑगस्ट 1967 रोजी गुरमीत  याचा जन्म झाला. शाह सतनाम यांनी राम रहीमला आपला वारस म्हणून घोषित केले. भारतापासून पंजाब वेगळा करण्याचा खंदा पुरस्कार करणाऱया गुरूजंतसिंग  राजस्थानी या खलिस्तान लिबरेशन फोर्सच्या (केएलएफ) कडव्या दहशतवाद्याशी राम रहीम यांची जवळीक होती. शाह सतनाम सिंगजी महाराज यांच्या कपाळात  गोळ्या घालून त्यांची गुरूजंतसिंगने हत्या केली. त्यानंतर राम रहीम डेराप्रमुख झाला. त्या वेळी त्यांनी आपले नाव ‘हजूर महाराज संत गुरमीत राम रहीम सिंग’ असे  घेतले. राम रहीम याने डेराच्या गादीवर बसण्यासाठी विशेष हालचाली केल्या होत्या, असा अनेक जणांचा संशय आहे. रामरहीम डेराप्रमुख झाल्यानंतर त्याने राजकीय  नेत्यांशी संबंध ठेवले. सिरसा परिसरात डेराकडे सुमारे सातशे एकर जमीन आहे. तेथे शस्त्रास्त्री चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तेथे राहणारे ब्रह्मचर्य पाळतात, परंतु  रामरहीम तीन मुलांचा बाप आहे. असे म्हणतात की, डेरा सच्चा मध्ये राहणाऱया 400 जणांना नपुंसक बनवण्यात आले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे गेले होते, काही  पुरावेही सापडले आहेत. या डेऱयामध्ये राहणाऱया स्त्राीयाही अत्याचारापासून सुटलेल्या नाहीत, असाही आरोप बाबा गुरमित रामरहीमवर आहे. 2002 मध्ये डेरामध्ये  गैरकृत्ये चालतात, असे उघड झाले होते. त्या वेळी एका साध्वीने तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीम यांनी बलात्कार केल्याचा  आणि तेथे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केले जात असल्याचा आरोप केला होता. येथील तीस ते चाळीस मुलींनी छळवणुकीचा आरोप केला होता. त्यातील एकीने  लिहिलेल्या पत्रात, आपणाला देवी म्हणवले जाते, पण प्रत्यक्षात वेश्येसारखे वागवले जाते. आपल्याला जिवाला धोका आहे, असे नमूद केले होते.  विविध घटनांमध्ये  राम रहीम याच्यावर बेकायदा कृत्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. जुलै 2002 मध्ये रामरहीमवर एका साध्वीच्या भावाचा खून केल्याबद्दल गुन्हा दाखल  झाला. याच युवकाने तिचे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोचवल्याचे बोलले जाते. रामरहीम याला लैगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर मोठा हिंसाचार  उफाळला आहे. ज्या दोन महिलांनी रामरहीमविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. भाजपचे खासदार साक्षी  महाराज यांनी नेहमीप्रमाणे  वाद्ग्रस्त विधान केले आहे, कोट्यवधी भक्त रामरहीम यांना देव मानतात.  हा फक्त राम रहीम यांना नाहीतर अन्य संत आणि भारतीय  संस्कृतीला बदनाम करण्याचा कट आहे, असे त्यांनी म्हटले आहे. रामरहीम सारख्या ढोंगी तथाकथित साधूंच्या नादाला लागलेले असे अंधभक्त पाहिले की, त्यांच्या  बुद्धीची किव कराविशी वाटते. केंद्र सरकारने याबाबत कडक भुमिका घेण्याची गरज आहे. कारण धार्मिक झुंडशाहीच्या आधारावर गैरकृत्ये करणाऱया बाबा-बुवांवर  निपक्षपणे कारवाई झाली तर त्यांचे प्रस्थ थांबून जनतेंला दिलासा मिळेल.
10 ऑक्टोबर2002 रोजी सिरसा येथील ‘पूरा सच’चे  संपादक राम चंदर छत्रपती यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. त्या प्रकरणी दोघांना अटक  केली होती. छत्रपतींनी डेरामधील घटनांबाबत वृत्तमालिका प्रसिद्ध करणे सुरू केले होते, त्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणी गुह्यात वापरलेली बंदूक डेराचा  व्यवस्थापक कृष्णलाल याच्या नावावर असलेली आढळली. तसेच त्यांच्या संवादासाठी वापरलेली वॉकीटॉकी यंत्रणेचा परवाना डेराच्या नावावर असल्याचे लक्षात  आले. गुरमीत राम रहीम सिंग हा गायक, अभिनेता आणि व्यावसायिकदेखील आहेत. रामरहीमला व्हीव्हीआयपी दर्जा आहे. त्याने ब्रिटनमधील वर्ल्ड रेकॉर्डस  युनिव्हर्सिटीतून पदवी मिळवली आहे. डेराने दोन वर्षांपूर्वी एमएसजी या नावाखाली स्वदेशी आणि सेंद्रिय उत्पादने बाजारात आणली आहेत. रामरहीम अशाप्रकारे  भक्तांचे सहाय्य घेऊन बाजारात उत्पादन विक्रीचा व्यवसायही करतो. धार्मिकतेच्या नावाखाली कृष्णकृत्ये करणाऱया बाबा-बुवांवर सरकारने कारवाया करण्याची गरज  आहे. धार्मिकतेच्या नावावर समाजाला नासवण्याचे कुकर्म करणाऱयांना जरब बसली पाहिजे, अशा कारवाया होणे गरजेचे आहे.