Breaking News

‘जलयुक्त’ कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे-एकनाथ खडसे

नाशिक, दि. 31, ऑगस्ट - जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यासाठी कामांचे जीओ टॅगींग करण्यात यावे.  तसेच कोणत्याही परिस्थितीत 15 नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
मृद व जलसंधारण विभाग आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आयोजित विभागीय  क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमाचे संचालक डॉ. कैलास मोते, भूजल  सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, आयआयटीचे तज्ज्ञ हेमंत बेलसरे,  आयडब्ल्युएमपीचे डॉ. प्रीतम वंजारी, उपायुक्त बाळासाहेब जेजूरकर आदी उपस्थित होते.
डवले म्हणाले, जलयुक्त अभियानाअंतर्गत कामे हाती घेताना अंदाजपत्रकाचा अभ्यास करूनच मान्यता देण्यात यावी. भूगर्भशास्त्राचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून  तांत्रिक बाबींकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अभियानातील लोकसहभाग वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्र उपचाराची कामे पूर्ण करण्यात आली असल्यास  इतर कामांना सुरवात करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच त्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण आवश्यक आहे. नियोजन करतना तांत्रिक बाबींचा अभ्यास  केल्याने अभियान अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य आहे. अभियानाशी निगडीत विविध पैलूंची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले  असून प्रत्येक गावात जलयुक्त शिवारअंतर्गत पाच सदस्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. डवले यांनी अधिकार्‍यांच्या शंकांचे निरसन करून  अभियानाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.