Breaking News

चिनी वस्तूंवर पूर्णत: बहिष्कार टाकण्याची प्रतिज्ञा करण्याचे ’विहिंप’चे आवाहन

नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट -  चीनकडून भारतीय अर्थव्यवस्थेबरोबरच आसपासचा भू प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताच्या पैशांतूनच  आमच्यावर हल्ला करण्याची भाषा करणार्‍या , दहशतवाद्यांना पाठिंबा देणा-या चीनला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने  चिनी वस्तूंवर पूर्णत: बहिष्कार टाकण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल यांनी आज येथे केले. दक्षिण दिल्लीतील  संत नगर येथे विहिंपकडून आज एक यज्ञ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
1962 च्या युद्धात 43 हजार चौरस किलोमीटरचा भूभाग गिळंकृत करणा-या चीनची आता अरुणाचल प्रदेशसह 90 हजार चौरस किलोमीटर भूभागावर वक्रदृष्टी  असल्याचेही बन्सल म्हणाले. देशाच्या व्यापार तुटीतील 60 टक्के वाटा चीनचा आहे. एकूण उत्पादनाच्या 24 टक्के वाटा चीनने ताब्यात घेतला आहे. परिणामी भारतीय  अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर जगात सर्वाधिक असूनही एकीकडे देशात बेरोजगारी, पर्यावरण असुरक्षितता व आर्थिक संकटातून जात आहे. दुसरीकडे चीन आपल्यावर  कुरघोडी करत आहे, असेही बंसल म्हणाले.
चीनकडून उत्पादित झालेल्या मग ती लहानशी राखीही असली तरी तिचा वापर न करण्याचा संकल्प केला पाहिजे. उपस्थित बहिणींनी भारतातील कापसापासून  स्वत:च्या हातांनी बनवलेला धागा रक्षासूत्र म्हणून आपल्या पराक्रमी सैनिकांचा सन्मान म्हणून बांधण्याचे आवाहन बन्सल यांनी केले.