Breaking News

न्या. दीपक मिश्रा यांनी घेतली सरन्यायधीश पदाची शपथ

नवी दिल्ली, दि. 28, ऑगस्ट - सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आज भारताच्या 45व्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना या पदाची शपथ दिली. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या वेळी उपराष्ट्रपती वैंकय्या  नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.
सध्याचे सरन्यायाधीश जे एस खेहर हे काल (27 ऑगस्ट) निवृत्त झाले. मिश्रा हे आता 3 ऑक्टोबर 2018पर्यंत सरन्यायाधीश पदावर असणार आहेत. मध्यरात्री  सुनावणी घेऊन याकूब मेमनची फाशी कायम ठेवणे, निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी फाशीची शिक्षा सुनावणे, देशातील सर्व चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवणे  अनिवार्य करणे यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय मिश्रा यांनी दिले आहेत. तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सुधारणा, ‘नीट’ आणि सुब्रता रॉय प्रकरण  अशा खटल्यांची सुनावणी सुरू असलेल्या न्यायाधीशांच्या खंडपीठात मिश्रा यांचा समावेश आहे.