Breaking News

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 9 ऑगस्टपासून स्वच्छता अभियान

नाशिक, दि. 07 - येत्या 9 ऑगस्टपासून स्वच्छतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ  महाराष्ट्राचा हे अभियान राबविण्यात येणार आहे. दि.2 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या अभियानाच्या अमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी प्रत्येक गट  विकास अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. त्या माध्यमातून 2017-18 या वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील  प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानाचा प्रारंभ दि.9 पासून होणार आहे. महाराष्ट्र 2019 पर्यंत हागणदारी मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याला  अनुसरून नाशिक जिल्हा परिषदेनेही 2018 मार्चअखेरपर्यंत जिल्हा परिषद हागणदारी मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 
जिल्ह्यात आतापर्यंत कळवण व नाशिक हे तीन तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. उर्वरित तालुके हागणदारीमुक्त करण्यासाठी या आर्थिक वर्षात हे उद्दिष्ट पार  करण्यासाठी जिल्हा परिषदेला 1 लाख 55 हजार शौचालयांचे बांधकाम करावे लागणार आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेने संकल्प स्वच्छतेचा,  स्वच्छ महाराष्ट्राचा या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून त्याचे शौचालय बांधणे व वापर करणे या साठी मत परिवर्तन करण्याच्या सूचना देण्यात  आल्या आहेत. त्यानुसार येत्या 9 ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतीत संबंधित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरंपच आदींच्या उपस्थितीत या  अभियानाचा प्रारंभ होईल. प्रत्येक गावात गृहभेटीसाठी पथकांची स्थापना करून त्यांना कुटूंबाचे वाटप करण्यात येणार आहे. गट विकास अधिकार्‍यांनी प्रत्येक  ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्यासाठी संपर्क अधिकार्‍याची नियुक्ती करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक गावात स्वच्छता फेर्‍या काढण्यात येणार आहेत. ग्रामसभा, गृहभेटी, शौचालय बांधकामांचा प्रारंभ, गुड मॉर्निंग पथक, टमरेल मुक्त गाव  अभियान, गरशिक्षण, कार्यशाळा, फिल्प शो, चित्ररथ अभियान आदी माध्यमातून स्वच्छतेविषयक व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.