Breaking News

चाबहार बंदराचा वापर 2018 मध्ये सुरू होईल - नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. 07, ऑगस्ट -  इराणमधील चाबहार बंदराच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. 2018 मध्ये या बंदराचा वापर सुरू होईल, अशी आशा केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
हसन रूहानी यांनी दुस-यांदा तेहरानच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारला. त्यानिमित्त आयोजित समारंभात भारताकडून गडकरी उपस्थित राहिले होते . भारत व  इराण या देशांत मजबूत ऐतिहासिक संबंध आहेत, असेही गडकरी यांनी इराण दौर्‍याच्या पूर्वसंध्येला सांगितले.
चाबहार बंदराच्या बांधणीचे काम आधीच सुरू झाले आहे. केंद्र सरकारकडून बंदर विकासासाठी सहा अब्ज रुपये देण्यात आले आहेत. यातील उपकरणांसाठी  लागणा-या 380 कोटी रुपयांच्या निधीसाठी देण्यात आलेल्या निविदांना मान्यता देण्यात आली आहे. हे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी इराण सरकार आवश्यक  प्रस्तावांना मंजुरी देईल. चाबहार बंदरामुळे दोन्ही देशांतील संबंध व या क्षेत्रातील व्यापाराला प्रोत्साहन मिळेल, असेही गडकरी म्हणाले.
चाबहार बंदर दक्षिण-पूर्व किनारपट्टीवर सिस्तान-बलुचिस्तान या क्षेत्रात आहे. हे बंदर भारताच्या रणनीतीच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात  भारत व इराण यांच्यात झालेल्या करारानुसार बंदराचे काम सुरू आहे. 10 वर्षांच्या भाडेतत्त्वावर 85.21 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. त्यातून दरवर्षी  22.95 अब्ज महसूल प्राप्त होणार आहे.