Breaking News

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे नवे नाव ‘विंडिज’

अँटिगुआ, दि. 03 - वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे नवे नाव ‘विंडिज’ असे करण्यात आले असून वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे नावही ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ असे करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला 90 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त नावांमध्ये हे बदल करण्यात आले. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाअंतर्गत आणि संलग्न असलेल्या सर्व संघांना आता नवे नाव वापरणे बंधनकारक असणार आहे. नवे नाव असलेले गणवेशही लवकरच वापरात येणार आहेत. तसेच, संकेतस्थळाचे नावही बदलून ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ करण्यात आले आहे तर 2 जूनच्या टी20 सामन्याआधी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.विंडिजक्रिकेट.कॉम या नव्या ‘मॅच सेंटर’चे अनावरण होणार आहे.
‘मंडळाचे आणि संघाचे बदललेले नाव हे अधिक समर्पक आहे. नावबदल हे मंडळाच्या विकासाच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे. मंडळाच्या विकासासाठी समभागधारकांनी आणि इतर सर्व संबंधित घटकांनी मंडळाशी सहकार्याची भावना ठेवावी’, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरॉन यांनी केले.