काळी-पिवळी व बसचा अपघात
17 प्रवासी जखमी, दोघांना केले औरंगाबाद येथे रेफर
बुलडाणा, दि. 24 - प्रवाशांनी खचाखच भरलेल्या व अवैध प्रवासी वाहतूक करणार्या काळी-पिवळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणार्या बसला जोरदार धडक दिली. या अपघातात काळी-पिवळीतील 6 व एसटी बसमधील 11 असे एकूण 17 प्रवासी जखमी झाले. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले. हा अपघात हा सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चिखली-मेहकर रोडवरील बाभुळखेड फाट्यावर घडला.प्रवाशांनी भरलेली काळी-पिवळी(एमएच-28-795) ही चिखलीवरुन मेहकरकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरुन येणारी बस (एमएच-40-9947) वर जोरदार धडकली. सदर अपघातात काळी-पिवळीचा समोरचा भाग चक्काचूर झाला असून यामध्ये राजू लाकडे, सुनिल लाकडे, वंदना सुनिल लाकडे, अश्विनी सुनिल लाकडे, अर्चना राजू लाकडे रा.गजरखेड, सर्जेराव गवई रा.चंदनपूर, रामप्रसाद मुंडकुळे, भगवान मुंडकुळे, रुक्मीना दामोदर मुंडकुळे रा.पिंपळगाव उंडा, काळी-पिवळी चालक किशोर प्रल्हाद सोनटक्के, धर्मेद्र मधुकर नवले रा.गजरखेड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर बसमधील गणेश जाधव, संभाजी मरिबा कांबळे, माधुरी राजधर सुरडकर, गणेश इंगळे, हिराबाई बाबुराव देशमुख, अरुणा बाबुराव देशमुख हे जखमी झाले असून स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच शिवसेना नेते ॠषी जाधव, योगेश जाधव, राजेंद्र गाडेकर, सुरेश वाळूक, विलास आखाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींची भेट घेवून विचारपूस केली. ठाणेदार मोतीचंद राठोड व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना वैद्यकीय उपचार तातडीने मिळण्यासाठी मदत केली.