Breaking News

सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड

नवी दिल्ली, दि. 28 - दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कुरापती चालूच आहेत. पाकिस्तानने दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद  सलाउद्दीनचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीरच्या नागरिकांच्या हक्काविषयी बोलणार्‍याला दहशतवादी घोषित करणं अयोग्य असल्याचं पाकिस्तानने म्हटलं  आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यादरम्यानच अमेरिकेने सय्यद सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा  तिळपापड होणं स्वाभाविक आहे.
काश्मीरप्रश्‍न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यात सय्यद सलाउद्दीन अडथळा बनत आहे. तसंच त्याने भारतीय लष्कराला स्मशानात बदलण्याची धमकी दिली आहे. शिवाय  सय्यद सलाउद्दीनची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनने काश्मीर खोर्‍यातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतली आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र  मंत्रालयाने म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भारत आणि अमेरिका एकत्र मिळून दहशतवादाविरोधात लढाई लढत  असल्याचं या निर्णयाने स्पष्ट झालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये जी परिस्थिती आहे, त्याला सीमेपलीकडून होणारा दहशतवाद जबाबदार असल्याचं अमेरिकेच्या  निर्णयाने स्पष्ट झालं, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितलं.