Breaking News

भंडारदरा परिसरात वृक्षलागवड

अकोले, दि. 08 - त्या दोघींनी आपल्या वडिलांच्या स्मृतीदिनी आदिवासी भागातील 100 मुलींना एकत्रित करीत परिसरात लावली 200 वृक्ष, 50 आदिवासी शेतकर्‍यांना दिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देवून साहित्य वाटप केले. आपल्या वडिलांच्या आठवणी जागविल्या. यावेळी वनाधिकारी, आदिवासी ग्रामस्थ, पदाधिकारी, कृषी अधिकारी यांनी त्यांचे कौतूक केले.
भंडारदरा येथील आनंदवन रिसोर्टचे मालक सतिंदरपाल आनंद हे वीस वर्षापूर्वी भंडारदरा येथे आले. त्यांनी पर्यटन विकासासाठी काम करून आनंदवन रिसोर्टची स्थापना केली. मात्र गतवर्षी ते आपल्या मित्रांसमवेत मुरशेत येथून येत असताना अपघाती मृत्यू झाला. आपल्या वडिलांनी केलेले काम पुढे नेण्याची प्रतिज्ञा करून त्यांच्या मुलींनी अशोक भांगरे व सुनिता भांगरे यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केंद्र सुरु करणे, तसेच आदिवासी शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठी मदत करून
जैवविविधता संवर्धनासाठी मदत करणे व परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा संकल्प आहे. सानिया व सायना या त्यांच्या मुलींनी आदिवासी भागातील सर्व मुलींना एकत्र करून त्यांचा वाढदिवस व स्मृतीदिन साजरा केला. त्यांची आई तरण आनंद यांचेसह अशोक भांगरे, सुनिता भांगरे, दिलीप भांगरे, प्राचार्य रोंगटे, वनक्षेत्रपाल पडवळ, कृषी अधिकारी माधव हासे, सोनवणे यांनी मदत केली.
याप्रसंगी सानिया म्हणाली, माझे वडील येथील निसर्गात 20 वर्षे रमले त्यांनी येथील जंगलात परमेश्‍वर पाहिला. त्यामुळे आनंदवन परिसरात 5 हजार झाडांचे रोपण व संवर्धन करून जैवविविधता टिकून ठेवली.
आदिवासी भागातील तरुणांना पर्यटन विकासातून स्वतःचा विकास हा मंत्र दिला. त्यांनी केलेल्या कामाचे स्मरण राहावे म्हणून आम्ही दोघी बहिणी हे काम पुढे चालू ठेवून त्यांच्या संस्काराचे रोपण करून संवर्धन करू असे सांगितले.