संसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून
नवी दिल्ली, दि. 25 - संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतीपदाच्या निवणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाजविषयक समितीची काल बैठक झाली. या समितीने अधिवेशनासाठी या तारखा सुचवल्याची माहिती देण्यात आली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन साधारणपणे जुलैच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होते आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संपते. मात्र, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे यावेळी ते लवकर घेण्यात येणार असून मतदानासाठी सर्व 776 खासदार दिल्लीत उपस्थित असावेत, असा यामागील उद्देश आहे.