Breaking News

गुन्हेगारांसह दोषी पोलीस अधिकार्‍यांची चौकशी करा- ना. विखे

संगमनेर, दि. 27 -  कुरण येथे निर्माण झालेल्या दंगल सदृष्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर गुन्हेगारांना शासन करतांनाच दोषी  पोलीस अधिकार्‍यांची चौकशी  करण्याच्या सूचना राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना केल्या.
गेल्या आठवड्यात कुरण येथे बेकायदेशीर गोवंश जनावरे ताब्यात घेण्यासाठी संगमनेर शहर पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे आपल्या सहकारी पोलिसांसमवेत कारवाई  करण्यास गेले असता पोलीस व ग्रामस्थ यांच्यात धुमश्‍चक्री निर्माण झाली होती. यात पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर उद्भवलेल्या अटक सत्रामुळे  कुरणमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. निरपराध  लोकांवर कारवाई करु नये अशी मागणी ग्रामस्थांमधून होवू लागल्याने ना. विखे यांनी काल कुरण येथे भेट  दिली. त्या पार्श्‍वभूमीवर गावकर्‍यांशी संवाद करतांना ते म्हणाले, एकूण परिस्थितीची माहिती घेतली असता पोलिसांची कारवाई संशयास्पद वाटत असल्याने आपण  गुन्हेगारांना शिक्षा तर झाली पाहिजे मात्र दोषी पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे.  यावेळी  गावातील लोकांनी ना. विखे यांना घडलेल्या सर्व परिस्थितीची  इतंभूत माहिती दिली. अमानुषपणे पोलिसांची दंडेलशाहीचा पाढाच  यावेळी लोकांनी वाचला.
यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार साहेबराव सोनवणे, श्रीरामपूरचे अतिरीक्त पोलीस अधिकारी रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डां.  अजय देवरे, सुदाम सानप, शौकत जहागिरदार, शरद थोरात, भास्कर दिघे, नानासाहेब दिघे, शफी शेख, हाफीज शेख, रईसखान, डॉ. शरद गोर्डे, अजिज शेख  आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे. व ज्या पोलीस अधिकार्‍यांमुळे कुरणमध्ये  दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली अशा पोलीस अधिकार्‍यांर्‍याची देखील चौकशी होवून कारवाई होेणे गरजेचे आहे.
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही कुरण येथे भेट देवून संपूर्ण परिस्थितीची माहिती घेवून वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांना घटनेचे गाभीर्य लक्षात आणून दिले.  दरम्यान दोन्ही नेत्यांनी कुरण येथे भेट दिल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याभरापासून तणावपूर्ण शांतता असणार्‍या कुरणमध्ये परिस्थिती  निवळली आहे. व्यवहार सुरळीत सुरु झाले आहे. यावेळी वादग्रस्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना निलंबित करावे, खर्‍या आरोपींना अटक करा, या घटनेची  सीबीआय मार्फत चौकशी करा अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांच्यावतीने ना. विखे यांना देण्यात आले.