Breaking News

जीवनात संघर्षाबरोबरच तडजोडही महत्त्वाची : शालिनीताई विखे

अहमदनगर, दि. 27 - प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष करण्याची वेळ नेहमीच येत असते. त्यातून वाट काढत पुढे जायचे असते. त्याबरोबरच जीवनात तडजोड करणे  फार महत्त्वाचे असते. ही गोष्ट लक्षात ठेवल्यास आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येते, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी केले.
जिल्हा समाज कल्याण विभागाच्यावतीने अपंग-सुदृढ विवाह, अपंग-अपंग विवाह, आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वितरण करण्यात  आले आहे. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्षा विखे बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या योजनेंतर्गत दिलेले अनुदान सर्वस्व नाही, परंतु या अनुदानातून चांगले  जीवन घडविण्यास निश्‍चित मदत होईल.
कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, उपाध्यक्षा राजश्री घुले, समाजकल्याण समिती सभापती उमेश परहर, महिला व बालकल्याण समिती सभापती  अनुराधा नागवडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे, जि.प.सदस्य सदाशिव पाचपुते, शाम माळी, सुप्रिया पाटील, समाजकल्याण अधिकारी नितीन  उबाळे आदी उपस्थित होते.
सभापती परहर म्हणाले की, जीवनात तडजोड करून आपले जीवन प्रत्येकाने चांगल्या पध्दतीने जगावे. अपंग दांम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतानाचा आपल्या  आचरणातून एक वेगळा आदर्श निर्माण करावा.
डॉ.कोल्हे म्हणाले की, समाजातील जातीभेद कमी करण्यासाठी शासनस्तरावरुन अनेक योजना आखल्या जातात. समाजात मानाने जीवन जगता येण्यासाठी शासनाने  दिलेली ही देणगी आहे. याप्रसंगी श्रीमती सुनंदा भागवत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  प्रास्ताविकात नितीन उबाळे म्हणाले की, अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास  प्रोत्साहन योजनेसाठी सन 2016-17 या आर्थिक वर्षात  प्राप्त निधीनुसार 16 लाभार्थींना अनुदान देण्यात आले. अपंग व्यक्तीने अपंग व्यक्तीशी विवाह केलेल्या 32  व आंतरजातीय विवाह केलेल्या 84 लाभार्थींना अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाऊसाहेब मोरे, श्रीमती गोमलाडू, जी.आर.जाधव,  विजय बळीद यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरेश म्हाळस यांनी सूत्रसंचालन केले. श्री.निमसे यांनी आभार मानले.