कत्तलीसाठी गायींच्या विक्रीवर बंदी
नवी दिल्ली, दि. 27 - गायी किंवा इतर गुरे-ढोरे कत्तलखान्यांना विकण्यावर केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. गुरांची विक्री ही केवळ शेतक-यांना किंवा शेतजमीनीच्या मालकांनाच करता येऊ शकेल, असा अध्यादेश केंद्र सरकारकडून काढण्यात आला आहे. हा नवा नियम लागू केल्यामुळे प्राण्यांच्या व्यापारावर बंधने येणार असून गोवंशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेले हे एक महत्वाचे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, गैरसमजातून गोरक्षकांकडून गायींचा व्यापार करणा-यांवर हल्ले होण्याच्या घटनाही कमी होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसात गोरक्षांकडून अशा प्रकारचे दोन हल्ले करण्यात आले होते. ईशान्य भारतातील बहुतांश भाग आणि केरळ वगळता संपूर्ण भारतात गोहत्याबंदी करण्यात आली आहे. विक्री करण्यात येणारी गुरे ही केवळ शेतीच्या कामांसाठीच वापरली जातील, त्यांची हत्या करण्यात येणार नाही, असे खरेदीकर्त्याने लिहून दिल्यावरच गुरांची विक्री करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
