Breaking News

कॉलेज कुमाराच्या वेशात दारू घेवून जाताना अटक

औरंगाबाद, दि. 12 - अवैध धंदे करण्याची चटक लागली की मंडळी कोणत्याही थराला कशी जातात याचे प्रत्यंतर सिल्लोड येथे एका कॉलेज कुमारच्या वेशातील व्यक्तीला स्कूल बॅगमधून सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी 190 देशी दारूच्या बॉटल जप्त केल्या तेव्हा आले. 
भराड़ी येथून बोरगाव बाजार कडे जाणा-या रस्त्यावर गस्त घालत असताना भराडी शिवारातील महादेव मंदिरासमोरून 2 कॉलेज कुमारच्या गणवेशातील व्यक्ती एका मोटारसायकलवर बसून भरधाव वेगात संशयास्पद जाताना दिसल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांनी मोटारसायकलवरील दोघांना थांबविले. त्यांच्याकडील कॉलेज बॅगची पाहणी केली असता त्यांचे बॅगमध्ये 190 देशी दारू संजीवनी संत्रा कागदी लेबल असलेल्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या. अवैधरीत्या विनापरवाना दारू विक्रीसाठी असे फंडे सुरू झाले आहे. ही दारू भराड़ी येथील सरकारी देशी दारूचे दुकानातून आणल्याचे या दोघांनी सांगितले.त्यांचे ताब्यातून 190 देशी दारू संजीवनी संत्रा कागदी लेबल असलेल्या सीलबंद 12,350/- रु. चे बाटल्या आणि 30,000/- रु. ची मोटारसायकल असा एकूण 42,350/- रु.चा मुद्देमाल मिळून आल्याने पो. काँ. भिकन सतुके यांचे फिर्यादवरून पो. स्टे. सिल्लोड ग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, स. पो. नि. शंकर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पो.हे.काँ. विठ्ठल चव्हाण हे करीत आहे. या मोटारसायकलस्वारांनी आपले नाव बाबू रामराव मोकासे आणि पुंडलिक किसन मोकासे रा. शेफेपूर पिशोर ता. कन्नड़ असे सांगितले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.