महिलांसाठी आमखास मैदानासमोर खास मदत केंद्र
औरंगाबाद, दि. 12 - पीडित महिलांसाठी खास मदत केंद्र ओएसपीसाठी (वन स्टॉप प्लेस) औरंगाबादेत आमखास मैदानासमोर उभे राहणार आहे. त्यासाठी नेहरूनगरच्या मनपा दवाखान्याजवळची जागा हस्तगत करण्याचे आदेश जिल्हा महिला व बाल विकास विभागाला मिळाले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान सेंटरच्या जागेचा आढावा घेण्यात आला. दिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर केंद्र शासनाच्या वतीने 2015 पासून देशभरात ओएसपी सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील 11 जिल्ह्यांपैकी औरंगाबादचाही यात समावेश आहे. योजना शंभर टक्के केंद्र शासन पुरस्कृत असून यासाठी राज्य शासन किंवा महापालिकेला पैसे खर्च करावे लागणार नाही. देशभरात असे किती सेंटर सुरू झाले याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा जिल्हा महिला व बाल विकास असून गेल्या 2वर्षांपासून या सेंटरसाठी जागाच उपलब्ध होत नव्हती. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ओएसपी सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र दिले. महापालिकेने पत्राची दखल घेत नेहरूनगरच्या मनपा दवाखान्याजवळची दोन खोल्यांची जागा निश्चित केली. योजनेच्या निकषांमध्ये सेंटर रुग्णालयाजवळ असावे किंवा मनपा किंवा सिव्हिल सर्जन, आरोग्य अधिका-याच्या दवाखान्याजवळ असावे अशी अट आहे. त्यानुसार सध्या नेहरूनगरची जागा मनपाने सुचवली. जिल्हा महिला व बाल विकास अधिकार्यांना ही जागा तात्काळ हस्तगत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओएसपी सेंटरमध्ये पीडितेला एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सेवा, विधी सेवा प्राधिकरणची उपलब्धता, पोलिसांची मदत, समुपदेशन अशी मिळेल. ही मदत तात्पुरती असली तरी तिची पुढील व्यवस्था महिला राजगृहात होईल व पुढेही तिला मदत केली जाईल. या बैठकीला जिल्हाधिका-यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे आदी उपस्थित होत्या.
