Breaking News

कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका पुर्ववत करण्याची शिक्षक भारती संघटनेची मागणी

अहमदनगर, दि. 27 - कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका पुर्ववत करुन, तासिका कमी करण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक भारती  संघटनेच्या वतीने राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक उपशिक्षणाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेवून, निवेदन देण्यात आले. कला व क्रीडा  शिक्षकांवर होणार्या अन्यायाबाबत राज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून उपशिक्षणाधिकारी यांची भेट घेवून सदर प्रश्‍नासंदर्भात चर्चा करण्यात आली. सदर  मागणी मान्य न झाल्यास सर्व शासकीय चित्रकला परिक्षा व क्रीडा स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.   इ.5 वी ते 8 वी कला व क्रीडा विषयाच्या तासिका कमी करण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे. संच मान्यतेने विशेष कला शिक्षकांचे पद स्वतंत्र्य दाखविण्यात यावे.  निवृत्त होणार्या क्रीडा व कला शिक्षकांच्या जागेवर पुर्णवेळ क्रीडा व कला शिक्षक नेमावे. अंशकालीन कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नियुक्तीचे धोरण रद्द करावे. राष्ट्रीय  शैक्षणिक धोरणानुसार कला व क्रीडा विषय शिक्षकांना 8 टक्के भारांश म्हणजेच आठवड्याला चार तासिका पुर्वीप्रमाणे चालू ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात  आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2016-17 पर्यंन्त 50 तासिकांचे वेळापत्रक सुरळीतपणे सुरु होते. नवीन आदेशानुसार आठवड्याला 50 तासिके ऐवजी 45 तासिकेचे नियोजन  करण्यात आले आहे. नियोजनामध्ये विषयवार भारांशानुसार तासिकांचे वाटप झालेले नाही. तासिका वाटपात अनावश्यक बदल करण्यात आले असून, कला व क्रीडा  विषयांचा भारांश चार टक्के वरुन अवघे दोन टक्के करण्यात आला. ही बाब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी नुकसान करणारी असल्याचे शिक्षक भारतीच्या वतीने  स्पष्ट करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप, विजय लंके, हनुमंत रायकर, शरद धोत्रे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, सचिव मोहंमद समी शेख,  कलाध्यापक संघटनेचे राज्य प्रतिनिधी संभाजी चौधरी, प्रदीप रुपटक्के, दिपक गोंधळे, अरविंद आचार्य, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे, श्रीकांत घाडगे, विलास गाडगे,  जितेंद्र आरु, अशोक धनवडे, शौकत बाबा, बशीर सय्यद आदि उपस्थित होते.