महामार्गावरील अपघातग्रस्त बसचालकाचे पलायन, 3 ठार, 29 जखमी
रत्नागिरी, दि. 27 - मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यात आगवे येथील अवघड वळणावर बसचालकाला अवघड वळणाचा अंदाज न आल्याने आज पहाटे झालेल्या अपघातात 3 जण ठार तर 29 जण जखमी झाले आहेत. स्वप्नाली राकेश शिर्के (वय 45, ताडदेव, मुंबई), दर्शन शशिकांत ठुकरूल (वय 10, पोंभुर्ले, देवगड, जि. सिंधुदुर्ग) आणि उमेश दुर्योधन सवणे (वय 30, रा. विक्रोळी, मुंबई) अशी अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. अपघातातील 29 जखमींवर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर बसचा चालक पळून गेला आहे. आगवे (ता. चिपळूण ) येथील अवघड वळणावर आज सकाळी पहाटे सव्वाचार वाजता ही आरामगाडी आली असता हा अपघात झाला. मुंबईत परळ येथून मालवणकडे निघालेली विशाल ट्रॅव्हल्सची आराम गाडी (क्र. एमएच 46-5252) चालक चंद्रशेखर दिलीप काळंगे (मूळ गाव खटाव, जि. सातारा, सध्या रा. भायखळा, मुंबई) बस घेऊन आला असता त्याला महामार्गावरील अवघड वळणाचा अंदाज न आल्याने बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली. त्यावेळी प्रवासी गाढ झोपेत होते. बस कलंडल्याने मोठा आवाज होताच बसमध्ये आर्त किंकाळ्या आणि वाचविण्यासाठी आरडाओरड सुरू झाली. अपघाताचा आवाज ऐकू येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दहा मिनिटात सावर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बसच्या मुख्य दरवाजावर बस कलंडल्याने प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते. पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. तत्पूर्वी दर्शन ठुकरूल आणि उमेश सवणे हे दोन प्रवासी जागीच ठार झाले होते. जखमी प्रवाशांना डेरवण रुग्णालयात नेत असताना स्वप्नाली शिर्के हिचा मृत्यू झाला. जखमींना डेरवण येथील कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय आणि खाजगी कालिकादेवी बचत गटाच्या रुग्णवाहिकांनी रुग्णालयात नेण्यात आले. जखमी प्रवाशांची नावे अशी : साक्षी शशिकांत ठुकरूल (44), पूजा शशिकांत ठुकरूल (15), शशिकांत सोनू ठुकरील (45), रुद्रा हरीश पारकर (10), हरीश सुधाकर पारकर (40), जतीन संजय सावंत (9), संजना संजय सावंत (32), रौनक सूर्यकांत घाणेकर (10, वडाळा), कमलाकर गोविंद पाटोळे (सांताक्रूझ), शीतल शेखर मसुरकर (51), दिलीप लहू परब (56), स्वाती सुधाकर पेडणेकर (50, भाईंदर), मधुरा मंगेश मयेकर (33), सुरेखा सुरेश कुंभार (45), मंगेश चंद्रकांत मयेकर (39, डोंगरी), सारिका सूर्यकांत घाणेकर (31), प्रथमेश हरीश पारकर (13, विरार), वैशाली हरीश कुडतरकर (60), नीलेश गोविंद ठुकरूल (31), श्रद्धा श्रीकांत मसुरकर (19), अशोक सीताराम गुरव (57), चित्राक्ष सचिन सावंत (1), पूजा सचिन सावंत (29, दोघेजण दिवा), पुरुषोत्तम ज्ञानदेव धुरी (56, सिंधुदुर्ग), रसिका सोनू बारगुडे (16), धोंडू शिवराम कोकाटे (49), राजेश विठ्ठू नायझे (36), स्वप्नाली सोनू बारगुडे (35, सर्वजण रत्नागिरी)
