Breaking News

मी राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहत नाही; शरद पवारांची स्पष्टोक्ती

पुणे, दि. 25 - लोकसभा आणि राज्यसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे उचित ठरणार नाही. तसेच मी स्वप्न देखील पाहत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
विधिमंडळ व संसदीय कार्यकिर्दीला 50 वर्षपूर्तीनिमित्त व पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवार यांचा सोलापुरात सर्वपक्षीय समितीच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शासकीय विश्रामगृहात पवार पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रवादीचे संख्याबळ केवळ 14 आहे. त्यामुळे मी राष्ट्रपतीपदाची स्वप्ने पाहत नाही. दोन्ही सभागृहात भाजपचे  संख्याबळ जास्त आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर भाजपच्या संख्याबळात वाढ झाली आहे.  त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्‍वासात घेऊन राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावे, असे पवार म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार भारत भालके, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ,  आमदार दिलीप सोपल,  आमदार सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, मनोहर सपाटे, बळीराम साठे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर आदी उपस्थित होते.