Breaking News

खराळवाडी खून प्रकरणातील नऊ जणांवर खोट्या गुन्ह्यांद्वारे कारवाई केल्याचा घरच्यांचा आरोप

पुणे, दि. 25 -  खराळवाडीतील सुहास हळदणकर खून प्रकरणात बारा जणांना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी नऊजणांना विनाकारण गोवण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशी करण्यासाठी बोलावून त्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे. त्यांच्यावर सूडबुद्धीने आरोप लावण्यात आले आहे, असा आरोप माजी नगरसेविका निर्मला कदम यांच्यासह इतरांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
खराळवाडी खून प्रकरणामध्ये पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारजण दिसत असताना इतर नऊ जणांना गोवण्यात आले आहे. ज्या नऊ जणांना यामध्ये गोवण्यात आले आहे त्यांच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती पत्रकारांना दिली. खून प्रकरणात ज्यांची नावे आहेत. त्या व्यक्ती घटने दिवशी त्या ठिकाणी नसल्याचे पुरावे देखील पोलिसांना देण्यात आले आहेत. परंतु पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगून पंधरा दिवसापासून त्यांना तुरुंगात ठेवले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून अटक करण्यात आलेल्या नऊ जणांना सोडून द्यावे अन्यथा मोर्चा आणि उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. खराळवाडी येथे 9 एप्रिलला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुहास हळदणकर या तरुणाचा खून झाला. त्या खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही’ची मदत घेतली. त्यामध्ये केवळ चारजण दिसत आहेत. मात्र, पोलिसांनी दबावापोटी अन्य नऊ जणांना गुन्ह्यात विनाकारण गोवले आहे.   या सर्वांना त्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे.