Breaking News

राजूरच्या पाणी प्रश्‍नाचे विरोधकांकडून राजकारण : सरपंच सौ.पिचड

। अकोले, दि. 25 - तालुक्यातील राजूर येथील नळपाणी पुरवठा योजनेची मोटार बिघाड झाल्याने राजूरकरांना गेली 10 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. नवीन मोटार आणण्यासाठी राजूर ग्रामपंचायतीने संबंधित कंपनीला पैसेही अदा केले आहेत. बुधवारी राजूरकरांना पाणी मिळेल. मात्र मदत करण्याऐवजी विरोधक सामाजिक विद्रोह वाढवून राजकारण करीत आहे. त्यांना जनतेने धडा शिकवावा असे पत्रक सरपंच सौ. हेमलता पिचड यांनी काढले आहे.
पत्रकात हेमलता पिचड यांनी आपली सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन पाणी योजना सुरु झाल्यापासून थकीत वीज बिल 1 कोटी 70 लाख रुपये माझ्या नेतृत्वाखाली 77 लाख 69 हजार एक रकमी भरून 99 लाख रुपये शासनाकडून सबसिडी द्वारे माफ करून नळयोजना कायमस्वरूपी कर्ज मुक्त केली. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी 14 लाख रुपये वीज बिल माफ करुन आणले. अजूनही त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत मात्र विरोधक ग्रामपंचायतीला कुलूप लावून पाणी प्रश्‍नाचे राजकारण करीत आहे.
अशाही परिस्थितीत ही पाणीपुरवठा योजना ज्या वेळी नादुरुस्त झालेली आहे, त्या वेळी तत्परतेने ती मी सुरु केलेली आहे. राजूरच्या पाणीपुरवठया वरील इलेक्ट्रिक मोटार रविवार दि. 16 एप्रिल रोजी तांत्रिक बिघाडीमुळे जळाली, अशाही परिस्थित विरोधकांनी पाण्याचे राजकारण केले. दुसर्‍याच दिवशी हेतुपुरस्कार ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मी समाजकारण करणारी सरपंच असल्याने अशा बाबी माझे दृष्टीने महत्वाच्या नाहीत.
मी तात्काळ संपुर्ण गावासाठी पिण्याचे पाण्यासाठी ट्रँकरने पाणीपुरवठा दुसर्‍याच दिवशी सुरु केलेला आहे. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. तोपर्यंत ट्रँकरने संपुर्ण गावाला पाणीपुरवठा सुरुच ठेवणार आहे. ग्रामपंचायतीने त्वरीत 86 एचपीचे नवीन मोटारीसाठी त्वरीत आरटीजीएस करुन नवीन मोटार बुक केलेली असून पाणीपुरवठा बुधवार पर्यंत सुरळीत करणार आहे. इतक्या तत्परतेने निर्णय घेवून देखील अशा प्रश्‍नात राजकारण आणणार्‍या विषयी गावातील जागरुक नागरिक विचार करणार आहे की नाही असा प्रश्‍न मला पडतो.
समाजातील ज्या जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी अशा प्रश्‍नात ग्रामपंचायतीला मदत करायला हवी त्यांनी आपली नैतिक जबाबदारी पार न पाडता सामाजिक विद्रोह वाढविण्याचे कामच केले आहे. परंतु समाज अशा भूलथापा करणार्‍यांवर विश्‍वास ठेवणार नाही याची मला खात्री आहे.
अशा संकटसमयी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मी करते व ग्रामपंचायत करत असलेल्या ट्रँकरचे पाणी हे पिण्याचे असलेने ते जपून वापरावे तसेच बाह्यशक्ती जो आपल्यावर संभ्रम तयार करत आहे त्या संदर्भात नागरिकांनी दक्ष राहून राजूर गावच्या अस्मितेसाठी पाणी प्रश्‍न राजकारण करणार्‍यांना योग्य तो धडा शिकविला पाहिजे ही माझी सरपंच म्हणून माफक अपेक्षा आहे.
आजपर्यंत ग्रामपंचायत विकास कामात आ. वैभवराव पिचड यांनी जातीने लक्ष घातलेले आहे. राजूरचे पाणी गुरुवार पर्यंत नवीन मोटारी आल्यानंतर ग्रामपंचायतच्या विकास कामांचा आढावा परत देण्यात येईल.